उमरान मलिक, सॅमसनला खेळविले जाण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नेपियर
भारत व यजमान न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा टी-20 सामना आज मंगळवारी येथे खेळविण्यात येणार असून खेळामध्ये आमूलाग्र बदल करणे ही भारताची गरज असली तरी उमरान मलिक व संजू सॅमसन यांना या सामन्यात तरी संधी मिळणार का, हा प्रश्न आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामन्याला सुरुवात होईल. दूरदर्शन (डीडी स्पोर्ट्स) वरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल. तसेच अमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीमिंग होईल.
टी-20 विश्वचषकात निराशा झाल्यानंतर नव्या खेळाडूंना आजमावून पाहण्याची अपेक्षा होती. पण तसे करण्यास संघव्यवस्थापन फारसे उत्सुक नसल्याचे दुसऱया सामन्यात दिसून आले. दुसऱया सामन्यात सूर्यकुमारने जबरदस्त खेळी केली नसती तर भारताला दीडशतकी मजल मारण्यासाठीही संघर्ष करावा लागला असता. पॉवरप्लेमधील भारताचा ऍप्रोच अजूनही चिंता करण्यासारखा आहे. रिषभ पंतला दुसऱया सामन्यात सलामीला पाठवून एक प्रयत्न करून पाहण्यात आला. पण ही चाल यशस्वी ठरली नाही. पंतचा दर्जा पाहता त्याच्याकडून या अंतिम सामन्यात मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे.
संजू सॅमसन हा आणखी एक फलंदाज आहे, जो आपला प्रभाव पाडू शकतो. पण त्याला संधी देण्यात आली नाही. दुसऱया सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंडय़ाच्या विधानाचा विचार करता अखेरच्या सामन्यात फार मोठे बदल होण्याची शक्यता नाही. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून आघाडी घेतली असून पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. न्यूझीलंडला या सामन्यात मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी आहे. ‘संघात बदल होणार की नाही, माहीत नाही. मला प्रत्येकाला संधी देण्याची इच्छा आहे. पण एकच सामना राहिला असल्याने तसे करणे कठीण आहे,’ असे हार्दिक म्हणाला.
वरिष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत शुबमन गिलला सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची अपेक्षा केली जात होती. पण त्याऐवजी संघाने दोन डावखुरे सलामीला खेळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुबमनला वनडेमध्येच संधी मिळेल, असे मानले जात आहे. गोलंदाजी करू शकतील, असे फलंदाज संघात हवेत, असे कर्णधाराने बोलून दाखविले आहे. त्यासाठी दीपक हुडा हा एक पर्याय त्याला मिळाला आहे. मात्र वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी न देणे सर्वात निराशाजनक ठरले. टी-20 साठी वेगवान गोलंदाजी करू शकणाऱयाची गरज असल्याने न्यूझीलंड दौऱयावर त्याला आजमावून पाहणे आवश्यक होते. हा दौरा त्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरला असता. बुमराहच्या गैरहजेरीत त्याला न्यूझीलंडसारख्या टॉप संघासमोर खेळण्याची संधी दिल्यास त्याला दडपण हाताळण्याचा थोडातरी अनुभव मिळाला असता. वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळालेल्या स्पिनर यजुवेंद्र चहलने दुसऱया सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखविली. पण मनगटी स्पिनर कुलदीप यादवला फक्त वनडेमध्येच संधी मिळणार असे दिसते.

केन विल्यम्सनची गैरहजेरी
न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी हा सामना जिंकण्याची गरज आहे. मात्र त्यांना या सामन्यात नियमित कर्णधार केन विल्यम्सनशिवाय उतरावे लागणार आहे. त्याची मेडिकल अपॉईंटमेंट आधीच निश्चित झाली असल्याने तो या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही, असे सांगण्यात आले. त्याच्या गैरहजेरीत यजमान संघातील सलामीवीर फिन ऍलेन व ग्लेन फिलिप्स यांच्यावर प्रतिस्पर्ध्यांवर दबाब आणण्याची जबाबदारी असेल. मागील सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये भरपूर धावा दिल्या होत्या, त्यावर त्यांना तोडगा काढावा लागेल. त्याचप्रमाणे बहरात असणाऱया सूर्यकुमारला रोखण्यासाठीही त्यांना मार्ग शोधावा लागणार आहे. ‘सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून आश्चर्यकारक अशी फटकेबाजी त्याने केली आहे. त्याच्या काही फटक्यांनी सारेच स्तिमित झाले आहेत. त्याला रोखण्यासंदर्भात आम्ही चर्चा केली असून सामन्याआधीही त्यावर चर्चा करणार आहोत,’ असे न्यूझीलंडचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले.
संभाव्य संघ ः भारत ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), पंत, इशान किशन, शुबमन गिल, हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, सुंदर, चहल, कुलदीप, हर्षल पटेल, सिराज, भुवनेश्वर, अर्शदीप, उमरान मलिक, उमरान मलिक.
न्यूझीलंड ः टिम साऊदी (कर्णधार), ऍलेन, ब्रेसवेल, कॉनवे, फर्ग्युसन, डॅरील मिचेल, मिल्ने, नीशम, फिलिप्स, सँटनर, इश सोधी, टिकनर, मार्क चॅपमन.
सामन्याची वेळ ः दुपारी 12 पासून
थेट प्रक्षेपण ः दूरदर्शन (डीडी स्पोर्ट्स)
लाईव्ह स्ट्रीमिंग ः अमेझॉन प्राईम व्हिडिओ.









