वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूष विश्वचषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी होणाऱ्या सामन्यात बलाढ्या नेदरलँड्स विरुद्ध भारताची सत्वपरीक्षा ठरणार आहे.
भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे तसेच 2016 साली लखनौ येथे झालेल्या कनिष्ठ पुरूष विश्वचषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले होते. तर 1997 साली इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने उपविजेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-2 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले होते.
क्वालालंपूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ करताना कोरियाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्पेनने भारतावर 4-1 अशी मात केली होती. ड गटातील शेवटच्या सामन्यात भारताने पुन्हा दर्जेदार खेळ करत कॅनडाचा 10-1 अशा फडशा पाडला होता. क गटातून भारताने दुसरे स्थान मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. या गटात भारताने तीन सामन्यातून दोन विजय नोंदवित दुसरे स्थान मिळविले. तर स्पेनने आपले तिन्ही सामने जिंकून अग्रस्थान घेतले आहे. ड गटात नेदरलँड्सचा संघ आघाडीवर असून त्यांनी दोन सामने जिंकले तर एक सामना बरोबरीत राखला. स्पेनविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघामध्ये अनेक त्रुटी जाणवल्या. पासेस देताना भारतीय खेळाडूंकडून ताळमेळ नसल्याचे दिसून आले होते. दरम्यान मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना आपल्या पूर्वीच्या चुकांमध्ये निश्चितच बदल दिसून येईल, अशी आशा भारतीय संघाचे प्रशिक्षक सी. आर. कुमार यांनी व्यक्त केली आहे. भारतीय संघ या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. दरम्यान मंगळवारचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना हा आमच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा राहिल, असे कुमार यांनी म्हटले आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामने येत्या गुरुवारी तर अंतिम सामना येत्या शनिवारी खेळविला जाईल.









