वृत्तसंस्था / झियामेन (चीन)
2025 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघाला मंगळवारी होणाऱ्या ड गटातील बलाढ्या इंडोनेशिया विरुद्धच्या लढतीत विजयाची नितांत गरज आहे. मात्र भारतीय बॅडमिंटनपटू पहिल्या लढतीत विजयासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले होते.
या स्पर्धेतील डेन्मार्क बरोबरच्या पहिल्या लढतीत भारतीय बॅडमिंटनपटूंना केवळ एक सामना जिंकता आला. पुरुष आणि महिला एकेरीतील सामने भारताने गमविले. एच.एस.प्रणॉय आणि पी. व्ही. सिंधू यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मंगळवारच्या लढतीत भारताला विजयासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. ड गटातील भारताची तिसरी लढत इंग्लंड बरोबर होणार आहे. पण भारताने मंगळवारची इंडोनेशियाबरोबरची लढत गमविली तर मात्र तिसरी लढत केवळ औपचारिकता म्हणून राहिला. लक्ष्य सेन, प्रणॉय, पी. व्ही. सिंधू सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत.
इंडोनेशियाचा अव्वल बॅडमिंटनटू जोनासेन ख्रिस्टीला लक्ष्य सेनने यापूर्वी दोनवेळा पराभूत केले आहे. सेनने त्याला अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत तसेच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हरविले होते. मंगळवारच्या लढतीमध्ये लक्ष्य सेन ख्रिस्टीवर सलग तिसरा विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या 11 व्या मानांकित पुत्री कुसूमा वेर्दानीबरोबर होणार आहे. या स्पर्धेत इंडोनेशियाची अव्वल बॅडमिंटनपटू मारिस्का सहभागी झालेली नाही. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांची उणिव भारतीय संघाला या स्पर्धेत चांगलीच जाणवत आहे. दुखापतीमुळे या जोडीने सदर स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने 2011 आणि 2017 साली उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.









