बेंगळूर
येथे सुरु असलेल्या 2023 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत शनिवारी होणाऱ्या नेपाळ विरुद्धच्या सामन्यात यजमान भारताला विजयाची नितांत गरज आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या समीप पोहचण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.
भारत आणि नेपाळ यांच्यात आतापर्यंत झालेल्या फुटबॉल सामन्यांचा आढावा घेतल्यास भारताची बाजू अधिक वरचढ वाटते. उभय संघामध्ये आतापर्यंत 23 सामने झाले असून त्यापैकी भारताने 16 वेळेला तर नेपाळने 2 वेळेला विजय मिळविला आहे. 2021 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारताने नेपाळचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील आतापर्यंत या दोन संघांमध्ये 8 वेळेला गाठ पडली असून भारताने 6 सामने जिंकले आहेत. तर नेपाळने 2 वेळेला भारताचा पराभव केला आहे. भारतीय फुटबॉल संघाची गेल्या काही दिवसातील कामगिरी निश्चित दर्जेदार झाल्याचे जाणवते. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या इंटरकॉन्टीनंटल चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद भारताने मिळविताना अंतिम सामन्यात लेबेनॉनचा 2-0 असा पराभव केला होता.
बेंगळूरच्या कंठीरेवा स्टेडियमवर सुरु असलेल्या या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4-0 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली होती. या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने हॅट्ट्रीक नोंदविली. पाक विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांना पंचांनी लाल कार्ड दाखविल्याने ते आता शनिवारी होणाऱ्या नेपाळ विरुद्धच्या सामन्यावेळी उपस्थित राहू शकणार नाहीत. आता सहाय्यक प्रशिक्षक महेश गवळी हे नेपाळ विरुद्धच्या सामन्यात प्रमुख प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळतील.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला होता. या स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी नेपाळला शनिवारच्या सामन्यात विजयाची आवश्यकता आहे. शनिवारी या स्पर्धेतील 2 सामने खेळविले जाणार आहेत. पाक आणि कुवेत यांच्यात पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. तर भारत आणि नेपाळ यांच्यातील दुसरा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल.