वृत्तसंस्था / दुबई
येथे सुरू असलेल्या 2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी भारत आणि लंका यांच्यात महत्वाचा सामना खेळविला जाणार आहे. भारतीय संघाला स्पर्धेतील आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी बुधवारच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळविणे जरुरीचे आहे. प्राथमिक गटातील भारताचा हा तिसरा सामना आहे.
पूर्वीच्या तुलनेत सध्याचा लंकन महिला संघामध्ये निश्चितच सुधारणा जाणवत असल्याची कबुली शेफाली वर्माने दिली आहे. अलिकडेच झालेल्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात लंकेने भारताचा पराभव करुन जेतेपद मिळविले होते. या पराभवाची आठवण आजही भारतीय संघाला सलत असून या पराभवाची परतफेड करण्याकरिता भारतीय संघ प्रयत्नांची शिकस्त करेल.
या स्पर्धेत भारतीय महिला संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारताने रविवारी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करुन या स्पर्धेत आपल्या विजयाचे खाते उघडले. आता भारताचा तिसरा सामना बुधवारी लंकेबरोबर होत आहे. या सामन्यात भारताला केवळ विजय पुरेसा नसून त्यांना या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. त्यामुळे भारताचा रनरेट अधिक होऊ शकेल. दरम्यान लंकन संघाची कर्णधार चमारी अट्टापटू हिच्या कामगिरीवरच लंकेचे यश अवलंबून राहिल. चमारी अट्टापटू ही अष्टपैलु असून ती उपयुक्त गोलंदाजही आहे. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. बुधवारच्या सामन्यात भारतीय संघाला सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल. लंकन संघाला कमी लेखण्याची घोडचूक भारतीय संघ निश्चितच करणार नाही. लंकेला कमी धावांत गुंडाळण्यासाठी भारतीय गोलंदाजांना वेगळे डावपेच आखावे लागतील तसेच फिरकी गोलंदाजांची सत्वपरीक्षा ठरेल.