पुढील 7-8 दिवसांमध्ये बैठकीचे आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची बैठक पुढील 7-8 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आली. या बैठकीत सामायिक कार्यक्रम आणि जागावाटपावर चर्चा होणार आहे. निवडणुकीसाठी सामायिक अजेंडा काय असावा याचा निर्णय विरोधी पक्ष या बैठकीत घेणार आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अधिक वेळ राहिलेला नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. यामुळे इंडिया आघाडीकडे आता केवळ अडीच महिन्यांचा वेळ शिल्लक आहे. यामुळे आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. 2019 च्या तुलनेत आमची मतांची हिस्सेदारी अलिकडेच निवडणुकांना सामोरे गेलेल्या राज्यांमध्ये अधिक राहिली असल्याचा दावा काँग्रेसच्या सूत्रांकडून करण्यात आला. या राज्यांमध्ये सप, आप या इंडिया आघाडीत सामील पक्षांनी निवडणूक लढविली होती. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी हे पक्षही काही जागांवर दावा सांगू शकतात.
5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेसला ‘इंडिया’ अंतर्गत अधिक जागांची मागणी करणे सोपे ठरणार नाही. बदललेल्या राजकीय स्थितीत काँग्रेसला काही राज्यांमध्ये अन्य पक्षांसाठी जागा सोडाव्या लागण्याची शक्यता अधिक आहे. विशेषकरून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये काँग्रेसला मागील निवडणुकीच्या तुलनेत फारच कमी जागा लढण्यासाठी मिळू शकतात. तर केरळमध्ये ‘इंडिया’ आघाडी अंतर्गत जागा वाटप होणे सद्यस्थितीत अवघड मानले जात आहे. कारण या राज्यात डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य सामना असणार आहे.









