वृत्तसंस्था/ चेन्नई
विश्व स्क्वॉश फेडरेशनतर्फे येथे सुरू असलेल्या 2022 विश्वचषक सांघिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारताने जपानचा पराभव करत ब गटात आघाडीचे स्थान मिळवताना उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. आता भारत आणि मलेशिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. ब गटातील झालेल्या लढतीतभारताने जपानचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या जोश्ना चिन्नाप्पाने जपानच्या साटोमी वटांबेचा 2-7, 7-4, 3-7, 7-5, 7-5 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात भारताच्या सौरभ घोषालने जपानच्या सुकुईवर 7-6, 6-7, 7-4, 3-7, 7-5 अशी मात करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या तन्वी खन्नाने जपानच्या मिडोरीकेवाचा 7-4, 7-1, 7-1 असा पराभव केला. मात्र शेवटच्या सामन्यात जपानच्या इंडोने भारताच्या अभयसिंगवर 7-6, 7-6, 7-2 अशी मात केली. या स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा 4-0 तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. तब्बल 12 वर्षानंतर विश्वचषक स्क्वॉश स्पर्धा भरवली जात असून या स्पर्धेचे चेन्नईला यजमान पद लाभले आहे. यजमान भारत, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, इजिप्त, हाँगकाँग, चीन, जपान, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा या स्पर्धेत सहभाग आहे. 17 जूनला या स्पर्धेचा समारोप होईल.









