जपान, दक्षिण कोरिया यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताने जपानचा 5-0 असा धुव्वा उडवित आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या एका उपांत्य सामन्यात मलेशियाने विद्यमान विजेत्या दक्षिण कोरियाला 6-2 अशा गोलफरकाने नमवित अंतिम फेरी गाठली. भारत व मलेशिया यांच्यात शनिवारी जेतेपदाची लढत होईल तर द.कोरिया व जपान यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी मुकाबला होईल.
भारताने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले होते. तीनवेळचे चॅम्पियन्स असलेल्या भारताने प्रारंभापासूनच आक्रमणाला सुरुवात केली. त्यामुळे जपानला आपल्याच क्षेत्रात भारताचे आक्रमण रोखण्यासाठी बचाव करावा लागत होता. पेनल्टी कॉर्नरच्या रूपात भारताला पहिली संधी मिळाली. पण जपानच्या गोलरक्षक ताकाहाशी योशिकावाने हरमनप्रीत सिंगचा हा प्रयत्न अप्रतिम बचाव करून फोल ठरविला. भारताने वेगवान खेळावर भर देत जास्तीत जास्त वेळ चेंडूवर ताबा ठेवला होता. पहिले सत्र कोरे गेल्यानंतर 19 व्या मिनिटाला भारताला पहिले यश मिळाले. जपानचा दुसरा गोलरक्षक ताकुमी किटागावाने हार्दिक सिंगचा फटका अडवल्यानंतर रिबाऊंड झालेल्या चेंडूवर ताबा घेत आकाशदीप सिंगने हा गोल नोंदवला.
दबाव कायम ठेवत भारताने 23 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि हरमनप्रीत सिंगने जोरदार फटका मारत त्यावर गोल नोंदवला. मध्यंतराच्या ठोक्याला मनदीप सिंगने भारताचा तिसरा गोल नोंदवला. मनप्रीत सिंगने या गोलची संधी निर्माण करून दिली होती. त्याने चेंडूवर ताबा घेत जपानच्या तीन डिफेंडर्सना हुलकावणी देत मनदीप सिंगकडे चेंडू सोपविला होता. उत्तरार्धातही भारताचे वर्चस्व कायम राहिले. सुमितने स्पर्धेतील सर्वोत्तम गोल म्हणावा असा गोल नोंदवला. त्याने बॅकस्टिक फ्लिक करीत भारताचा चौथा गोल केला. यासाठी मनप्रीतने उजव्या बगलेतून गोलची संधी निर्माण करून दिली होती. युवा कार्ती सेल्वमने 51 व्या मिनिटाला भारताची आघाडी 5-0 अशी केली. सुखजीत सिंगने यासाठी त्याला पास पुरविला होता. सुखजीतकडे हरमनप्रीतने उंचावरून चेंडू त्याच्याकडे मारला होता.
मलेशिया विजयी
त्याआधी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात मलेशियाने दक्षिण कोरियाचा 6-2 असा धुव्वा उडवित अंतिम फेरी गाठली. फैजल सारी, शेलो सिल्वेरियस (2), अबू कमाल अझराय, नजमी जाझलन (2) यांनी मलेशियाचे गोल केले. वू चेऑन जि व कर्णधार जाँगह्युन जँग यांनी दक्षिण कोरियाचे गोल नोंदवले. पाचव्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने चीनचा 6-1 असा पराभव केला.









