वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत रविवारी यजमान भारत आणि मलेशिया यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. यजमान भारताला या स्पर्धेत आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे. दरम्यान पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल करण्यासाठी भारतीय हॉकीपटूंना कसरत करावी लागेल.
शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या जपानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला 15 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले आणि त्यापैकी एका कॉर्नरवर भारताने गोल नोंदविला. उर्वरीत 14 पेनल्टी कॉर्नर्स वाया गेले. कर्णधार हरमनप्रित सिंग, वरूणकुमार, अमित रोहिदास आणि जुगराजसिंग यांना मात्र पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी चांगलाच सराव करावा लागेल. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 7-2 अशा गोलफरकाने पराभव केला होता. या सामन्यात भारताने 7 पैकी 6 गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले होते. प्रमुख प्रशिक्षक क्रेग फुल्टॉन हे भारतीय खेळाडूंकडून पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी चांगला सराव करून घेत आहेत. या स्पर्धेत मलेशियाने पाकिस्तानचा 3-1 असा तर दुसऱ्या सामन्यात चीनचा 5-1 असा पराभव करून आपली विजयी घोडदौड कायम राखली असल्याने भारताला रविवारच्या सामन्यात मलेशियाचा पराभव करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. मलेशियाची बचावफळी भक्कम असून ती भेदण्यासाठी भारतीय आघाडी फळीतील खेळाडूंना आपल्या डावपेचात बदल करावा लागेल.









