वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे झालेल्या 2026 फिफा विश्वचषक दुसऱ्या फेरीच्या पात्रता लढतीत भारताने कडवा प्रतिकार केला, मात्र कतारकडून त्यांना 0-3 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला.
कतारने याहून मोठ्या फरकाने सामना जिंकला असता. पण त्यांनी अनेक संधी दवडल्याने त्यांना तसे करता आले नाही. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कतारनेच पूर्ण वर्चस्व राखले होते. मुस्तफा तारिक मशाल (चौथे मिनिट), अल्मोझ अली (47 वे मिनिट), युसूफ अदुरिसाग (86 वे मिनिट) यांनी कतारचे गोल नोंदवले. चार वर्षापूर्वी भारताने कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले होते, त्यातूनच प्रेरणा संघाने खेळ केला. पण त्याची पुनरावृत्ती त्यांना करता आली नाही. भारतानेही अनेक संधी वाया घालविल्या. गोल करण्याच्या संधी त्यांना फारशा निर्माण करता आल्या नाहीत. अफिफला 14, 22, 26 व्या मिनिटाला मिळालेल्या संधींचा लाभ घेता आला नाही.
भारताला गट अ मध्ये अजूनही दुसरे स्थान मिळवित तिसऱ्या फेरीत स्थान मिळविण्याची संधी आहे. 16 नोव्हेंबर रोजी भारताने कुवैतवर 1-0 असा विजय मिळविला होता. भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध ताजिकिस्तानमधील दुशान्बे येथे पुढील वर्षी 21 मार्च रोजी होणार आहे.









