वृत्तसंस्था/ चियांग मेयी (थायलंड)
येथे सुरू असलेल्या किंग्ज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इराकने भारताचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या पराभवामुळे आता भारतीय संघाला कास्यपदकासाठीच्या प्ले ऑफ सामन्यात लेबेनॉनशी लढत द्यावी लागणार आहे. या स्पर्धेत रविवारी इराक आणि थायलंड यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेमध्ये दुसऱ्या उपांत्य लढतीत थायलंडने लेबेनॉनचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारत अणि इराक यांच्यातील सामन्यात 79 मिनिटापर्यंत भारताने इराकवर 2-1 अशी आघाडी मिळवली होती. 80 व्या मिनिटाला पंचांनी इराकला पेनल्टीची संधी दिली आणि इराकचा स्ट्रायकर घदबानने भारतीय संघातील बचावफळीतील दोघांना हुलकावणी देत गोल नोंदवल्याने हा सामना निर्धारित वेळेत 2-2 असा बरोबरीत राहिला. यानंतर पंचांनी पेनल्टीचा अवलंब केला. पेनल्टीमध्ये इराकने भारतावर 5-4 अशी मात केली. पेनल्टीमध्ये भारतातर्फे ब्रेन्डॉन फर्नांडिसला आपल्या फटक्यावर गोल नोंदवला आला नाही. या सामन्यात भारताचा महत्त्वाचा फुटबॉलपटू सुनील छेत्री सहभागी झाला नव्हता. अलीकडच्या कालावधीत छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने गेल्या 12 सामन्यात एकही पराभव पत्करलेला नव्हता पण त्यांची ही विजयी घोडदौड इराकने या सामन्यात रोखली. या स्पर्धेमध्ये सुनील छेत्री सहभागी झाला नव्हता. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी छेत्री पहिल्यांदाच एका मुलाचा बाप बनल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकला नव्हता. फिफाच्या मानांकनात इराक 70 व्या तर भारत 99 व्या स्थानावर आहे.
इराकविरुद्धच्या या सामन्यात 16 व्या मिनिटाला महेश नाओरेमने भारताला आघाडी मिळवून दिली होती. 28 व्या मिनिटला करीम अलीने इराकचे खाते उघडून बरोबरी साधली. करीम अलीने हा गोल पेनल्टीवर नोंदवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 51 व्या मिनिटाला इराकचा कर्णधार आणि गोलरक्षक जलाल हसन याच्या नजर चुकीमुळे भारताला इराककडून हा दुसरा बोनस गोल मिळाला. दरम्यान इराक संघातील झिदान इक्बाल याने भारतीय खेळाडूशी दांडगाई केल्याने पंचांनी त्याला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. त्यामुळे इराकला 10 खेळाडूनिशी खेळावे लागले. या संधीचा भारताला फायदा उठवता आला नाही. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना पंचानी इराकला पेनल्टीची संधी दिली आणि घदबानने इराकचा दुसरा गोल नोंदवला. दरम्यान घदबानचा हा गोल वादग्रस्त ठरला. पंचांनी यानंतर पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये इराकने भारताचा 5-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आतापर्यंत भारत आणि इराक यांच्यात 7 वेळा सामने झाले असून त्यापैकी 6 सामने इराकने जिंकले तर एक सामना बरोबरीत राहिला होता. उभय संघामध्ये यापूर्वीचा आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचा सामना 2010 च्या नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात आला होता आणित्या सामन्यात इराकने भारताचा 2-0 असा पराभव केला होता.









