आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप : 33-28 फरकाने शानदार विजय : सलग चार विजयासह गटात भारत अव्वल स्थानावर
वृत्तसंस्था /बुसान (दक्षिण कोरिया)
आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्या इराणचा 33-28 अशा फरकाने पराभव केला. भारत आणि इराण यांच्यात पहिल्या मिनिटांपासूनच रंगतदार सामना झाला. अखेरीस भारताने बाजी मारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा हा सलग चौथा विजय आहे. या कामगिरीसह भारत गटात अव्वलस्थानावर असून भारतीय संघाचे चार सामन्यात आठ गुण आहेत. इराण सहा गुणासह दुसऱ्या तर चिनी तैपैई चार गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, अंतिम लढत होण्याआधी भारताचा अखेरचा साखळी सामना शुक्रवारी हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. याशिवाय, जपान व इराण यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. अखेरच्या साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत आघाडीवर असणाऱ्या दोन संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ 8 गुणासह आघाडीवर आहे. यामुळे जपान व इराण यांच्यातील विजेत्यांशी भारतीय संघाचा अंतिम सामना होईल.
सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या भारतीय संघाने इराणविरुद्ध शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. भारतीय संघाचा कर्णधार पवन सेहरावत याने दमदार खेळीचं प्रदर्शन केले. पवनने 33 पैकी 16 गुण एकट्याने मिळवत विजयात मोलाची भूमिका बजावली. अस्लम इनामदारने 11 व्या मिनिटाला मारलेली रेडमध्ये दोन गुणांची कमाई केली. भारताने इराणला ऑलआऊट करत आपली आघाडी 11-5 केली. सेहरावतने पहिल्या हाफला चार मिनिटं बाकी असताना भारताची आघाडी 17-7 केली. यानंतर इराणच्या डिफेंडरने इनामदारविरोधात सुपर टॅकलचा वापर केला. पहिल्या हाफ अखेरीस भारतीय संघ 19-9 असा आघाडीवर होता. यानंतर सध्याचा आशियाई चॅम्पियन इराण पहिल्या हाफनंतर आपला खेळ उंचावत शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या हाफ च्या प्रारंभीच इराणने भारताला ऑलआऊट करत 26-22 अशी पिछाडी भरुन काढली. इराण फक्त चार गुणांनी भारताच्या मागे होता. पण, अखेरच्या काही मिनिटांत भारताने आपला खेळ उंचावला. सुपर टॅकलनंतर अर्जुन देशवाल याने दोन गुण मिळवत भारताला 33-28 च्या फरकाने विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचा चौथा विजय
आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने याआधी सलामीच्या सामन्यात यजमान दक्षिण कोरियाचा 76-13 असा एकतर्फी धुव्वा उडवला होता. दुसऱ्या सामन्यात चिनी तैपेईला 56-20 असे तर जपानला 62-17 असे पराभूत केले होते. गुरुवारी इराणवरील विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने आठव्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपच्या विजेतेपदाकडे कूच केली आहे. आतापर्यंत भारताने सातवेळा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. इराणने 2003 मध्ये एकदा ही स्पर्धा जिंकली आहे.









