आशिया चषक पात्रता बास्केटबॉल : इराण 86-53 फरकाने विजयी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या एफआयबीए आशिया चषक पात्रता बास्केटबॉल स्पर्धेत भारताने 27 व्या मानांकित इराणला जोरदार लढत दिली. मात्र गट ई मधील सामन्यात भारताला इराणकडून 53-86 अशा बास्केट्सनी पराभव पत्करावा लागला.
जागतिक मानांकनात भारतीय संघ 81 व्या स्थानावर असणाऱ्या भारताने या लढतीची प्रभावी सुरुवात केली. आघाडीवीर प्रणव प्रिन्सने प्रतिस्पर्ध्यांना अचूक थोपवण्यात यशस्वी कामगिरी केल्याने पहिल्या मिनिटालाच दोन गुणांची आघाडी मिळवून दिली. लय मिळवण्यासाठी इराणच्या खेळाडूंनी थोडा वेळ घेतला. पण लय सापडल्यानंतर त्यांच्या खेळाडूंनी शारीरिक उंचीचा लाभ उठवत भारतीय बचावफळीला दडपणाखाली ठेवले. पण भारताने चांगला खेळ करीत पहिल्या सत्राअखेर इराणला केवळ तीन गुणांची आघाडीच मिळविता आली. भारताने प्रतिआक्रमणात वेगवान खेळ केला. पण रिबाऊंड्सवर त्यांना झगडावे लागले आणि मध्यंतराला ते 32-42 असे पिछाडीवर पडले.
प्रिन्सने भारतातर्फे सर्वाधिक 11 गुण मिळविले तर अरवेंद कुमार मुथू कृष्णन, मुइन बेग हाफीझ यांनी प्रत्येकी 9 गुण मिळविले. इराणसाठी बेहनाम याखचलीने सर्वाधिक 15 गुण नोंदवले तर मोहम्मद अमिनी, सालार मोन्जी यांनी प्रत्येकी 14 गुण नोंदवले.
भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक व्हेसेलिन मॅटिक म्हणाले की, ‘भारताकडे गुणवत्ता आहे. पण त्यांना अनुभवाची गरज आहे. नोव्हेंबरमध्ये पुढील पात्रता स्पर्धा होणार असल्याने आम्हाला मोठा कालावधी मिळणार आहे. या अवधीत राष्ट्रीय संघ क्लब चॅम्पियनशिपमध्ये आणि अनेक एक्सपोजर दौऱ्यात सहभागी होणार आहे. आम्ही विजयी कामगिरी करू, असा मला विश्वास वाटतो,’ असेही ते म्हणाले.
भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कझाकस्तानकडून 50-63 असा पराभव स्वीकारला असल्याने गटात भारतीय संघ तळाच्या स्थानावर आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये भारताचा पुढील सामना कतारविरुद्ध होणार आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंत पात्रता स्पर्धा होणार असून सहा गटातील पहिले दोन अव्वल संघ पुढील वर्षी सोदी अरेबियात होणाऱ्या प्रमुख स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच प्रत्येक गटातील तिसरे स्थान मिळविणारे संघ शेवटच्या पात्रता फेरीत खेळणार आहेत. ड









