वृत्तसंस्था/ लंडन
2022-23 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो लिग स्पर्धेतील सुरू झालेल्या युरोप टप्प्यातील शनिवारी झालेल्या सामन्यात यजमान ब्रिटनने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा सलगा दुसरा पराभव आहे. तत्पुर्वी येथील ली व्हॅली स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन्स बेल्जियमने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता.
शनिवारच्या सामन्यात सहाव्या मिनिटाला ब्रिटनचे खाते नर्सने मैदानी गोलवर उघडले. 13 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रित सिंगने या संधीचा अचूक फायदा घेत भारताला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 31 व्या मिनिटाला ब्रिटनचा दुसरा गोल थॉमसने नोंदवला. 33 व्या मिनिटाला ली मॉर्टनने ब्रिटनचा तिसरा गोल केला. 42 व्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रित सिंगने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवला. प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारतातर्फे हरमनप्रित सिंगने आतापर्यंत 35 गोल नोंदवले होते. ब्रिटनच्या निकोलासने 53 व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवून भारताचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले.
हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा झाला. भारतातर्फे एकमेव गोल मनदीप सिंगने नोंदवला. तर बेल्जियमतर्फे थिबेयू स्टोकब्रोक्स 18 व्या मिनिटाला तर नेल्सन ओनेनाने 60 व्या मिनिटाला गोल नोंदवले. या सामन्यात पहिल्या 15 मिनिटामध्ये भारतीय खेळाडूंनी आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता तर भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंगने भारतीय आघाडी फळीचे नेतृत्व केले होते. या सामन्यात बेल्जियमच्या गोलरक्षक व्हॅन डोरेन याची कामगिरी दर्जेदार आणि भक्कम झाल्याने भारताला बरोबरी साधता आली नाही. पहिल्या 10 मिनिटात भारतीय खेळाडूंनी किमान दोनवेळा बेल्जियमच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण गोलरक्षक व्हॅन डोरेनने भारताची ही आक्रमणे थोपविली. 14 व्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. अमित रोहीदासने 28 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी गमवली. 18 व्या मिनिटाला स्टोकब्रोक्सने बेल्जियमचे खाते उघडले तर मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना मनदीप सिंगने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. हा सामना बरोबरीत राहिल असे वाटत असतानाच 60 व्या मिनिटाला ओनानाने पेनल्टी कॉर्नर बेल्जियमचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना यजमान ब्रिटन बरोबर होत आहे.









