पावसाचा व्यत्यय आलेल्या पहिल्या वनडेत भारतीय महिला 40 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ मिरपूर
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय संपादन केला होता. यानंतर रविवारी उभय संघांमध्ये वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 43 षटकांच्या झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, भारतीय महिला संघ बांगलादेशविरुद्ध वनडे सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 19 रोजी मिरपूर येथे होईल.
पहिल्या वनडेची सुरुवात पावसाने झाली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 43 षटकांत 152 धावांवर गारद झाला. यानंतर सुमारे तासभर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर तो 44 षटकांचा करण्यात आला. 153 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 113 धावांत गारद झाला. या विजयासह बांगलादेश महिला संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
प्रारंभी, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शर्मिन अख्तरला भोपळाही फोडता आला नाही. मुर्शिदा खातूनने 13 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने सर्वाधिक 3 चौकारासह 39 धावा केल्या. तिला फरगाना हकने 27 धावा करत चांगली साथ दिली. याशिवाय, रबाया खानने 10, फहिमा खातूनने नाबाद 12, सुलताना खातूनने 16 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे बांगलादेशचा डाव 43 षटकांत 152 धावांवर आटोपला. पदार्पणाच्या सामन्यातच भारतीय संघाकडून अमनजोत कौरने 4 बळी घेत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. देविका वैद्यने 2 गडी बाद केले.
भारताची फलंदाज फ्लॉप
प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. संघाचा टॉप आणि मध्यम क्रम फ्लॉप झाला. प्रिया पुनिया 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली, तर स्मृती मानधनाने 11 धावांत तिची विकेट गमावली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण ती 5 चेंडूत 5 धावा करून बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जने 10 धावा केल्या. दीप्ती शर्माने 20 तर देविका वैद्य 10 धावांवर नाबाद राहिली. इतर फलंदाज स्वस्तात बाद झालयाने टीम इंडियाचा डाव 35.5 षटकात 113 धावांवर संपुष्टात आला आणि भारतीय संघाला 40 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशकडून मारुफा अख्तरने सर्वाधिक 4 गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली. रबाया खानने 3 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश महिला संघ 43 षटकांत सर्वबाद 152 (निगार सुलताना 39, फरगाना हक 27, सुलताना खातून 16, अमनजोत कौर 31 धावांत 4 बळी, देविका वैद्य 2 बळी).
भारतीय महिला संघ 35.5 षटकांत सर्वबाद 113 (दीप्ती शर्मा 20, यास्तिका भाटिया 15, अमनजोत कौर 15, देविका वैद्य नाबाद 10, मारुफा अख्तर 29 धावांत 4 बळी, रबाया खान 30 धावांत 3 बळी).