वृत्तसंस्था/ अँटवेर्प ( बेल्जियम) :
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लीग पुरुषांच्या हॉकी स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 3-2 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळविला. या स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची कामगिरी दर्जेदार झालेली नाही. या स्पर्धेत भारताने यापूर्वी नेदरलँड्स आणि अर्जेंटिना संघाकडून प्रत्येकी 2 सामने गमाविले आहेत.
शनिवारच्या सामन्यात भारतीय संघातील अभिषेकने 8 व्या मिनिटाला आणि 35 व्या मिनिटाला असे 2 गोल करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाला आपले खातेही उघडता आले नाही. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या डावपेचात बदल करत भारतीय बचावफळीवर चांगले दडपण आणले. 42 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचे खाते नाथन इप्रामुसने उघडले. ऑस्ट्रेलियाला 56 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे 2 मेनल्टी कॉर्नर मिळाले. याचा फायदा त्यांच्या जोएल रिनटेलाने घेतला. रिनटेलाने 56 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल करत भारताशी बरोबरी साधून दिली. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला त्याचा पेनल्टी कॉर्नरवरील गोल निर्णायक ठरल्याने भारताला हा सामना थोडक्यात गमवावा लागला.
प्रो-लीग हॉकी स्पर्धेच्या युरोपियन टप्प्यात भारताने पहिले 4 सामने गमविले आहेत. शनिवारच्या सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारताच्या आघाडी फळीने अचूक आणि वेगवान खेळावर भर देत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात भारताला ही आघाडी राखता आली नाही. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगला दुखापतीमुळे खेळवले गेले नाही. भारताने या सामन्यात अनेक पेनल्टी कॉर्नर वाया घालविले. शेवटच्या 10 मिनिटात ऑस्ट्रेलियाला 4 पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यापैकी 2 कॉर्नरवर त्यांनी गोल केले.









