वृत्तसंस्था/ अल खोर (कतार)
मंगळवारी येथे झालेल्या शेवटच्या गट सामन्यात सीरियाकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागल्याने भारत आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बदली खेळाडू उमर खरबिनने 76 व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल करून सीरियाला बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.
भारताला या स्पर्धेत एकही गोल करता आला नाही आणि तिन्ही सामने गमावल्याने चार संघांच्या ‘ब’ गटात त्यांच्या वाट्याला तळाचे स्थान आले. या स्पर्धेच्या 1984, 2011 आणि 2019 च्या आवृत्त्यांमध्येही भारत बाद फेरीत प्रवेश करू शकला नव्हता. 1964 मध्ये देशाने उपविजेतेपद पटकावले होते, पण तेव्हा केवळ चार संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.









