चॅम्पियनशिपमध्ये भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ किंगडाव, चीन
एचएस प्रणॉयने झुंजार खेळ केला तरी बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमधील उपांत्यपूर्व भारताला जपानकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
2023 मध्ये दुबईत झालेल्या स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळविले होते. पण येथे दुय्यम खेळाडूंचा समावेश असलेल्या जपानकडून पराभव स्वीकारावा लागल्याने पदक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. या लढतीत भारताला लय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो या जागतिक क्रमवारीत 37 व्या स्थानावर असणाऱ्या भारतीय जोडीला मिश्र दुहेरीच्या सामन्यात जागतिक बाराव्या मानांकित हिरोकी मिदोरिकावा व नात्सू सायतो यांच्याकडून 13-21, 21-17, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. जागतिक आठव्या मानांकित तोमोका मियाझाकीने भारताच्या जागतिक 31 व्या मानांकित मालविका बनसोडने कडवा प्रतिकार केला, तरीही तिला 12-21, 19-21 असे पराभूत व्हावे लागले. या विजयानंतर जपानला 2-0 अशी आघाडी मिळाली.
भारताचे आव्हान जिवंत ठेवण्याची जबाबदारी प्रणॉयवर येऊन पडली होती. त्याने निर्धारी खेळ करीत कडवा संघर्ष केला. पण त्यालाही जागतिक सोळाव्या मानांकित केन्टा निशिमोटोने 21-14, 15-21, 21-12 असे सव्वातासाच्या खेळात हरवित जपानला 3-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. नंतरचे दोन सामने खेळविण्यात आले नाहीत. जपानने या स्पर्धेत अव्वल खेळाडू उपलब्ध नसल्याने दुय्यम खेळाडूंना उतरविले आहे. जपानने 2017 मध्ये झालेल्या पहिल्या आवृत्तीत जेतेपद तर 2019 मधील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.









