चीनचा दुटप्पीपणा केला जगासमोर उघड : मुंबई हल्ल्याच्या गुन्हेगाराचा ड्रॅगनकडून बचाव
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताने 26/11 हल्ल्याप्रकरणी वाँटेड लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीरचा ऑडिओ जारी केला आहे. यात साजिद मीर मुंबईवरील हल्ल्यात सामील पाकिस्तानी दहशतवाद्यांना निर्देश देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. अमेरिकेने 20 जून रोजी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारतही याचा सह-प्रस्तावक होता. परंतु चीनने स्वत:चा नकाराधिकार वापरत हा प्रस्ताव रोखला आहे.
भारतीय विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता यांनी याप्रकरणी देशाची बाजू मांडताना संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवाद्याचा ऑडिओ ऐकविला आहे. 28 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत साजिद मीरची आणखी एक ऑडिओ क्लिप प्ले करण्यात आली होती. यात तोन फोनवरून दहशतवाद्यांना ‘जेथे कुठे लोक दिसतील तेथे गोळीबार करा’ असे सांगत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते.
प्रथम मृत्यूचा ड्रामा, मग शिक्षा
पाकिस्तानने जगासमोर धूळफेक करण्यासाठी प्रथम साजिद मीरला मृत घोषित केले होते. त्याची कथित डीएनए चाचणीही करण्यात आली होती, परंतु काही काळानंतर साजिद जिवंत असल्याचे समोर आले होते. आंतरराष्ट्रीय दबावापोटी पाकिस्तानने साजिदला अटक केली होती. अलिकडेच पाकिस्तानच्या न्यायालयाने साजिदला दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याप्रकरणी 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार
साजिद मीर हा डेव्हिड कोलमॅन हेडलीचा हँडलर होता. तसेच साजिदने दहशतवाद्यांना मुंबईवरील हल्ल्याकरता प्रशिक्षण दिले होते. हेडली सध्या अमेरिकेच्या तुरुंगात कैद आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तोयबाच्या 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतील चार ठिकाणी हल्ले केले होते. हे हल्ले सुमारे 4 दिवसांपर्यंत चालले होते. या हल्ल्यांमध्ये 160 हून अधिक जण मारले गेले होते आणि यात 26 विदेशी नागरिक सामील होते. मुंबई पोलिसांनी अजमल कसाब नाव असलेल्या दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. तर उर्वरित 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले होते. कसाबला 11 नोव्हेंबर 2012 रोजी फासावर लटकविण्यात आले होते.
अमेरिकेकडून साजिदवर इनाम
अमेरिकेने साजिद विरोधात 50 लाख डॉलर्सचे इनाम घोषित केले आहे. अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयनुसार दहशतवादी साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबासाठी 2001 पासून सक्रीय होता. त्याने लष्कर-ए-तोयबासोबत मिळून अनेक दहशतवादी हल्ल्यांच कट रचले होते. मीर विरोधात अमेरिकेने 22 एप्रिल 2011 रोजी अटक वॉरंट जारी केले होते.
चीनकडून दहशतवाद्यांची पाठराखण
चीनने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देखील साजिदचा बचाव केला होता. तर पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ असगरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्यासाठी अमेरिका अन् भारताने मांडलेल्या प्रस्तावावरही चीनने नकाराधिकार वापरला होता. याचबरोबर मागील वर्षी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा पुत्र तालहा सईद विरोधात आणलेला प्रस्तावही चीनने रोखला होता.









