वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
इंटरकॉन्टिनेन्टल चषक फुटबॉल स्पर्धेतील लेबनॉनविरुद्धच्या आपल्या साखळी फेरीतील सामन्यात अनेक संधी भारताने गमावल्याने शेवटी गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. संघामध्ये भरीव बदल करण्याचे धोरण कायम ठेवत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी आघाडीपटू सुनील छेत्री आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना बाहेर बसविले. बचाव फळीतील खेळाडू संदेश झिंगनने छेत्रीच्या अनुपस्थितीत कर्णधाराची जबाबदारी पेलली.
मात्र या निकालामुळे परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. कारण चार देशांच्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांनी आधीच आपली जागा निश्चित केली आहे. या स्पर्धेत मंगोलिया आणि वानुआतू हे अन्य दोन संघ सहभागी झाले आहेत. 82 व्या मिनिटाला छेत्रीला अनिऊद्ध थापाकडून अचूक चेंडू मिळाला होता. पण भारताच्या कर्णधाराला जाळ्यात चेंडू सारता आला नाही. खरे तर सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांतच भारत 1-0 असा आघाडीवर गेला असता, परंतु लाल्लियानझुआला छांगटेने चेंडू पुरविल्यानंतर केवळ विरोधी गोलरक्षकाला चकविण्याचे काम चौथ्या मिनिटाला अनिऊद्ध थापाला करता आले नाही. त्याने चेंडू बाहेर फटकावला.
त्यानंतर, 20 व्या मिनिटाला गोलक्षेत्रात मिळालेली एक चांगली संधी वाया घालविताना आशिक कुऊनियानने थेट लेबनीज गोलरक्षकाकडे चेंडू फटकावला. भारताला दोन संधी हुकल्याने मध्यांतराच्या वेळी दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत राहिले. उत्तरार्धातही याच प्रकारे वाटचाल चालू राहून दोन्ही संघांना लक्ष्य भेदण्यात अपयश आले. या सत्रात काही मिनिटे फ्लडलाइट्स बंद राहण्याचा प्रकारही घडला.
भारताने गेल्या शुक्रवारी मंगोलियावर 2-0 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेला सुऊवात केली होती आणि तीन दिवसांनंतर सोमवारी वानुआतूला 1-0 ने पराभूत केले होते. लेबनॉनचा सामना सोमवारी मंगोलियाविऊद्ध गोलशून्य बरोबरीत राहण्यापूर्वी त्यांनी वानुआतूचा 3-1 असा पराभव करत विजयाने सुऊवात केली होती.
दरम्यान, या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात वानुआतूने मध्यंतरानंतर 18 सेकंदांनी केलेल्या गोलच्या जोरावर मंगोलियाचा 1-0 ने पराभव केला. यामुळे लेबनॉनचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होऊन मंगोलिया तळाशी फेकला गेला आहे.









