वृत्तसंस्था/ चेंगवान (दक्षिण कोरिया)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएल कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारताने चार सुवर्णपदकांसह पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवताना चीनला मागे टाकले आहे. चीनने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजी स्पर्धेत पार्थ माने, अभिनव शॉ आणि धनुद श्रीकांत यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचप्रमाणे महिलांच्या स्कीट प्रकारात रेझा धिलॉने रौप्यपदक तर पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल वैयक्तिक नेमबाजीत उमामहेश मदिनेनीने कास्यपदक मिळवले. या स्पर्धेत भारताने एकूण 9 पदकांची कमाई तिसऱ्या दिवसाअखेर केली आहे. त्यामध्ये 4 सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कास्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील आता सहा दिवस बाकी आहे.
पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात पार्थ, अभिनव आणि धनुद यांनी 1886.7 गुणासह सुवर्णपदक पटकावले. चीनने या क्रीडा प्रकारात 1883.5 गुण घेत रौप्यपदक तर कोरियाने कास्यपदक घेतले. या स्पर्धेतील अभिनव शॉचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. सोमवारी या स्पर्धेत अभिनव शॉ आणि गौतमी भानोत यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.









