न्यूझीलंडचा 108 धावात खुर्दा, सामनावीर मोहम्मद शमी, सिराज, पांडय़ा प्रभावी
वृत्तसंस्था/ रायपूर
रायपूरच्या नव्या स्टेडियमवरील भारतीय वेगवान गोलंदाजीच्या भन्नाट कामगिरीमुळे शनिवारी येथे यजमान भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका सीलबंद केली. या मालिकेतील दुसऱया सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. 18 धावात 3 गडी बाद करणाऱया मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना इंदूरमध्ये येत्या मंगळवारी खेळविला जाईल. भारतीय संघ आता या मालिकेत न्यूझीलंडचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 34.3 षटकात 108 धावात आटोपला. त्यानंतर भारताने 20.1 षटकात 2 बाद 111 धावा जमवित या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी मिळविली.
न्यूझीलंडकडून मिळालेल्या 109 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताने या नव्या खेळपट्टीवर सावध सुरुवात केली. भारताची वेगवान गोलंदाजी प्रभावी ठरल्याने न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज तितकेच दर्जेदार असल्याने भारताने गाफीलपणा दाखविला नाही. कर्णधार शर्मा आणि गिल या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच सावध फलंदाजी केली. या जोडीने 14.2 षटकात 72 धावांची भागीदारी केली. डावातील पंधराव्या षटकात रोहित शर्मा शिप्लेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 50 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा झळकविल्या. शिप्लेचा खाली राहिलेला चेंडू स्वीप करण्याच्या नादात रोहित बाद झाला. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेला विराट कोहली सँटेनरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक लॅथमकरवी यष्टीचित झाला. भारताचा हा दुसरा फलंदाज 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्याने 9 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. गिल आणि ईशान किसन या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. गिलने 53 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 40 तर ईशान किसनने 9 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 8 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे शिप्ले आणि सँटेनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

क्रिकेट शौकिनाचा मैदानात प्रवेश
रायपूरच्या या नव्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याची संधी पहिल्यांदाच उपलब्ध झाल्याने शौकिन खुष झाले होते. हे नवे स्टेडियम प्रेक्षकांनी भरगच्च झाले होते. कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अचानक एक युवा शौकिन सुरक्षा व्यवस्थेला बगल देत मैदानात शिरला आणि त्याने रोहितशी हस्तांदोलन करून त्याला शुभेच्छा दिल्या.
भारताचा 55 वा विजय
भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये आतापर्यंत 116 वनडे सामने खेळले गेले आहेत. भारताने 55 सामने जिंकले असून न्यूझीलंड संघाने 50 सामन्यात विजय मिळविला आहे. उभय संघातील 11 सामने अनिर्णित तसेच वाया गेले आहेत. 2010 च्या जानेवारीपासून भारतीय संघाने क्रिकेटच्या वनडे प्रकारात दर्जेदार कामगिरी केली असून आतापर्यंत त्यांनी 26 वनडे मालिकांपैकी 23 मालिका जिंकल्या असून तीन मालिका गमावल्या आहेत.
तत्पूर्वी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱयाच्या जोरावर न्यूझीलंडचा 108 धावात खुर्दा केला. नव्याने येथे बांधण्यात आलेल्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाजांनी तो सार्थ ठरविला.

तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत हैद्राबादचा पहिला सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांची फलंदाजी दमदार झाली. पण शेवटच्या षटकामध्ये भारताने न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले होते. रायपूरच्या या नव्या स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत फारसे अंदाज बाळगता येत नसल्याने कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. खेळपट्टीवर बऱयापैकी हिरवळ असल्याने याचा लाभ वेगवान गोलंदाजीला होईल, हा अंदाज अचूक ठरला. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि हार्दिक पांडय़ा यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना दमविले.
या सामन्यात मोहम्मद शमी हा न्यूझीलंडचा कर्दनकाळ ठरला. त्याने 18 धावात 3 तर हार्दिक पांडय़ाने 16 धावात 2 तसेच मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 1 बळी मिळविला. नवोदित वॉशिंग्टन सुंदरने 2 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. मोहम्मद शमीच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीच्या ऍलनचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडाला. कॉनवे आणि निकोल्स यांना बचावात्मक फलंदाजीवर भर द्यावा लागला. दरम्यान, सहाव्या षटकातील तिसऱया चेंडूवर मोहम्मद सिराजने निकोल्सला गिलकरवी झेलबाद केले. त्याने 2 धावा जमविल्या. मोहम्मद शमीने न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना स्वतःच्याच गोलंदाजीवर मिचेलला टिपले. त्याने 1 धाव केली. कर्णधार शर्माने गोलंदाजीत बदल करून हार्दिककडे चेंडू सोपविला. हार्दिक पांडय़ाने स्वतःच्याच गोलंदाजीवर कॉनवेचा अप्रतिम झेल घेतला. त्याने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. कर्णधार लेथम डावातील 11 व्या षटकात शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर गिलकडे झेल देत तंबूत परतला. लेथमने केवळ 1 धाव जमविली. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 10.3 षटकात 5 बाद 15 अशी केविलवाणी होती.
न्यूझीलंडचा संघ तिहेरी धावसंख्या गाठेल किंवा नाही, असे वाटत असतानाच फिलिप्स आणि मिचेल ब्रेसवेल यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गडय़ासाठी 41 धावांची भागीदारी केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दणकेबाज शतक झळकविणारा ब्रेसवेल मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ईशान किसनकरवी झेलबाद झाला. मोहम्मद शमीचा हा तिसरा बळी ठरला. त्याने 30 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. ब्रेसवेल बाद झाल्यानंतर फिलिप्सला सँटेनरची बऱयापैकी साथ लाभली. या जोडीने सातव्या गडय़ासाठी 47 धावांची भर घातल्याने न्यूझीलंडला 108 धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक पांडय़ाने डावातील 31 व्या षटकात सँटेनरचा त्रिफळा उडविला. सँटेनरने 39 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. वॉशिंग्टन सुंदरने फिलिप्सला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. त्याने 52 चेंडूत 5 चौकारांसह 36 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. फिलिप्स बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांना न्यूझीलंडचे शेवटचे दोन फलंदाज बाद करण्यास अधिक झगडावे लागले नाही. वॉशिंग्टन सुंदरने फर्ग्युसनला एका धावेवर बाद केले. कुलदीप यादवने टिकनेरला 2 धावांवर पायचीत करून न्यूझीलंडला 34.3 षटकात 108 धावांवर रोखले. न्यूझीलंडच्या डावात केवळ 13 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 34.3 षटकात सर्वबाद 108 (ऍलेन 0, कॉनवे 7, निकोल्स 2, मिचेल 1, लॅथम 1, फिलिप्स 36, ब्रेसवेल 22, सँटेनर 27, शिप्ले नाबाद 2, फर्ग्युसन 1, टिकनेर 2, अवांतर 7, मोहम्मद शमी 3-18, मोहम्मद सिराज 1-10, शार्दुल ठाकुर 1-26, हार्दिक पांडय़ा 2-16, कुलदीप यादव 1-29, वॉशिंग्टन सुंदर 2-7).
भारत 20.1 षटकात 2 बाद 111 (रोहित शर्मा 51, शुबमन गिल नाबाद 40, कोहली 11, ईशान किसन नाबाद 8, अवांतर 1, शिप्ले 1-29, सँटेनर 1-28).









