वृत्तसंस्था / कोलंबो
हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या लंकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये तिरंगी वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना येथे रविवारी यजमान लंका आणि भारत यांच्यात खेळविला जाणार आहे.
या तिरंगी वनडे मालिकेत द. आफ्रिका महिलांचा तिसरा संघ राहिल. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला संघामध्ये नवोदित काशवी गौतमच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष राहिल. के. गौतम ही वेगवान गोलंदाज आहे. आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला संघामध्ये गौतमचा समावेश होता. अलिकडेच झालेल्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत के. गौतमने गुजरात जायंट्स संघाकडून खेळताना 9 सामन्यात 6.45 धावांच्या सरासरीने 11 गडी बाद केले होते. या तिरंगी मालिकेसाठी तितास साधू, रेणूकासिंग ठाकुर आणि पूजा वस्त्रकर हे खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघात सहभागी झाले नसल्याने त्यांच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने अरुंधती रे•ाr, अष्टपैलु अमनज्योत कौर, दिप्ती शर्मा, स्नेह राणा आणि नवोदित के. गौतम यांच्यावर राहिल. कर्णधार हरमनप्रित कौर फिरकी गोलंदाजी करु शकते. भारतीय महिला क्रिकेट संघाने अलिकडच्या कालावधीत तिरंगी मालिकेतील शेवटचे सहा वनडे सामने विंडीज आणि आयर्लंड विरुद्ध जिंकले आहेत. उपकर्णधार स्मृती मानधना, हरमनप्रित कौर, रिचा घोष, जेमीमा रॉड्रिग्ज आणि हर्लिन देवोल, दिप्ती शर्मा आणि अमनज्योत कौर या भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे.
या मालिकेसाठी लंकन महिला संघाने सहा खेळाडू बदलले असून त्यामध्ये चार नवोदितांना संधी दिली आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज इनोका रणविराचे या मालिकेसाठी लंकन संघात पुनरागमन झाले आहे. लंकन संघामध्ये सुगंधीका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी आणि कविशा दिलहारी या तीन प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. चमारी अट्टापटूकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.









