रोहित, कोहली, राहुल, अय्यर यांच्या आगमनाने भारताचे पारडे जड अनफिट बुमराह मालिकेतून बाहेर
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारत व लंका वनडे मालिकेतील पहिला सामना आज येथे होत असून या सामन्याआधी भारतीय संघाच्या संमिश्र भावना झाल्या आहेत. एकीकडे रोहित शर्मा, विराट कोहली यासारखे अव्वल खेळाडू संघात परतले आहेत तर दुसरीकडे हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह पूर्ण फिट नसल्यामुळे पुन्हा एकदा संघाबाहेर फेकला गेला आहे. या डे-नाईट सामन्याला दुपारी 1.30 पासून सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.

बुमराहच्या आगमनाने भारतीय गोलंदाजी भक्कम होणार अशी अपेक्षा केली जात होती. पण त्याचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. त्याच्या पाठीला झालेल्या स्ट्रेस प्रॅक्चरमधून तो अद्याप पूर्ण बरा झालेला नसल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी करताना त्याच्या पाठीत अजूनही वेदना होत असल्याचे कर्णधार रोहित शर्माने सांगितले. या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. पण बीसीसीआयच्या सपोर्ट स्टाफ व मेडिकल टीमने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेचा विचार करून त्याला इतक्यातच न खेळविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘तो संघासोबत गुवाहाटीला गेला नसून ऑस्ट्रेलियविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची गरज असल्याने पूर्ण फिटनेस मिळविण्यासाठी त्याला आणखी वेळ देण्याची गरज आहे,’ असे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका सुरू होत असून या मालिकेसाठी तरी तो उपलब्ध होतो का, हे पहावे लागेल. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे विश्वचषक होणार असल्याने बुमराहला वगळल्याने त्याचा फिटनेस व पुनर्वसन याबाबतचे गूढ वाढले आहे.
लंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर हे अव्वल खेळाडू संघात परतल्याने भारताची बाजू भक्कम झाली आहे. दहा महिन्याच्या कालावधीत आशिया चषकमधील सामने वगळता भारताचे एकूण 15 वनडे सामने होणार आहेत. त्यातून संघात समतोल आणण्यासाठी आणि आयपीएल व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वर्कलोडचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे. मात्र बुमराहमुळे व्यवस्थापनासमोर थोडी अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय अव्वल पाच फलंदाजांना निवडण्याच्या समस्येलाही व्यवस्थापनाला सामोरे जावे लागेल.

सलामीवीर रोहित शर्मा व तिसऱया क्रमांकाचा विराट कोहली यांचा क्रम निश्चित आहे तर फॉर्मचा विचार करता इशान किशन व अय्यर यांना वगळणे कठीण जाऊ शकते. अलीकडेच बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत इशानने वेगवान द्विशतक नोंदवताना 210 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे रोहितसमवेत सलामीला येण्यासाठी इशान व शुबमन गिल यांच्यात चुरस असेल. गिल बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळला नसला तरी त्याने वनडेमधील आपली योग्यता सिद्ध करून दाखविलेली आहे.
अय्यरने गेल्या वर्षी वनडेमध्ये स्वप्नवत घोडदौड केली असून 15 डावांत त्याने 55.69 च्या सरासरीने 724 धावा फटकावल्या. भारतीय फलंदाजीचा तो कणा बनला असून त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची तसेच मधल्या षटकांत फिरकीला समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता आहे. उपखंडातील खेळपट्टय़ांवर हा अत्यंत महत्त्वाचा गुण मानला जातो. त्यानंतर गेले वर्ष आपल्या तुफानी व अचंबित करणाऱया फलंदाजीने गाजविणाऱया सूर्यकुमार यादवचा क्रम लागतो. टी-20 क्रिकेटमधील कामगिरीने त्याचा वनडेमध्ये समावेश करण्यास मॅनेजमेंटला त्याने भाग पाडले आहे. नुकत्याच झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात त्याने 51 चेंडूत नाबाद 112 धावा फटकावल्या. हा सामना भारताने 91 धावांनी जिंकला होता. सलामीवीराव्यतिरिक्त टी-20 मध्ये तीन शतके नोंदवणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. मात्र त्याची वनडे कारकीर्द अद्याप पुरेशी बहरलेली नाही. 16 सामन्यांत त्याने फक्त 384 धावा जमविल्या असून त्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र यावेळी त्याला व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.
गोलदांजीत शमीचेही पुनरागमन झाले असून त्याला अंतिम संघात सिराज, अर्शदीप, उमरान मलिक यापैकी एकासह स्थान मिळेल. नवा उपकर्णधार हार्दिक पंडय़ाची गोलंदाजीही उपयुक्त ठरू शकते. त्याने फारशी गोलंदाजी केलेली नसली तरी कर्णधार त्याचा किती षटकासाठी वापर करतो हे पहावे लागेल. दुहेरी मालिका जिंकण्याचा इरादा असल्याने खेळाडूंची निवड ही भारतासाठी गोड डोकेदुखी ठरणार आहे.

लंकेचा टी-20 मालिकेत खेळलेलाच संघ कायम असून त्या मालिकेत कर्णधार दसुन शनाकाने कप्तानी प्रदर्शन केले होते. लंकेला आघाडी फळीत स्थिरता हवी असून निसांका भक्कम सुरुवात करून देईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी त्याने 11 सामन्यात 491 धावा फटकावल्या होत्या. तो फॉर्म कायम राखण्याचा तो प्रयत्न करेल. मध्यफळीत असालंका भक्कम कामगिरी करीत असून त्याने मागील वर्षी 53.25 च्या सरासरीने धावा जमविल्या आहेत. या संघात लेगस्पिनर जेफ्री व्हान्डरसेचा समावेश केला असून भारतीय खेळपट्टय़ांवर तो निश्चितच उपयोगी ठरेल. गेल्या वर्षी वनडेमध्ये त्याने लंकेतर्फे सर्वाधिक 14 बळी मिळविले होते.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), शुबमन गिल, कोहली, सूर्यकुमार, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान, सुंदर, चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, शमी, सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
लंका ः दसुन शनाक (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), निसांका, अविष्का फर्नांडो, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, अशेन बंदारा, महीश तीक्षणा, करुणारत्ने, मधुशन्का, रजिता, नुवानिंदू फर्नांडो, वेलालगे, प्रमोद मधुशान, लाहिरु कुमारा.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.









