कर्णधार सुनील छेत्रीचा शेवटचा सामना
वृत्तसंस्था/ कोलकाता
येथे गुरुवारी होणाऱ्या यजमान भारत आणि कुवेत यांच्यातील फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला निरोप देण्यासाठी असंख्य फुटबॉल शौकीन उपस्थित राहणार आहेत. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून छेत्रीला सुखद भेट देण्यासाठी प्रयत्न करेल.
39 वर्षीय सुनील छेत्रीने आपल्या वैयक्तिक 19 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीततून निवृत्त होत आहे. त्याच्या कारकीर्दीतील हा शेवटचा सामना आहे. फिफाच्या विश्वकरंडक स्पर्धेत पात्र फेरीच्या अंतिम 18 संघांच्या टप्प्यामध्ये भारतीय संघाला प्रवेश मिळवून देण्यासाठी छेत्रीचा प्रयत्न राहिल. आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र फेरीच्या स्पर्धा खेळविलया जात आहेत. या पात्र फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 गटामध्ये प्रत्येक चार संघांचा समावेश आहे. या 9 गटातील आगाडीचे पहिले दोन संघ तिसऱ्या टप्प्यात दाखल होतील. 2026 सालातील फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा उत्तर अमेरिकेत होणार असून गुरुवारच्या सामन्यात भारताने कुवेतवर विजय मिळविला तर भारताला पुढील फेरीसाठी आशा बाळगता येईल. अ गटातून भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. कतारचा संघ या गटात 12 गुणासह पहिल्या स्थानावर असून भारत 4 सामन्यातून चार गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. या गटात भारत आणि अफगाण यांनी समान चार गुण मिळविले असले तरी सरस गोल सरासरीवर भारताने अफगाणला मागे टाकले आहे. कुवेतने 3 गुण मिळविले आहेत. गुरुवारच्या सामन्यात भारताने विजय मिळविला तर भारताला अफगाणला मागे टाकण्याची संधी मिळेल. अफगाणचा या गटातील पुढील सामना कतारबरोबर होत आहे.
फुटबॉल शौकिनांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू आणि भारतीय संघाचा अनुभवी कर्णधार सुनील छेत्रीला मैदानावर खेळताना पाहण्याची ही शेवटची संधी आहे. बेंगळूरमध्ये 2023 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने कुवेतचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशा गोलफरकाने विजय मिळविला. या सामन्यात छेत्रीची कामगिरी अविस्मरणी ठरली होती. हा सामना गुरुवारी सायंकाळी 7 वाजता सुरू होईल.