वृत्तसंस्था/ रांची
येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक महिलांच्या हॉकी स्पर्धेत शनिवारी यजमान भारत आणि कोरिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय महिला संघाने आपली अपराजित घोडदौड राखल्याने शनिवारच्या सामन्यात कोरियावर अधिक मानसिक दडपण राहील.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या राऊंड रॉबिन लिग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने कोरियाचा 5-0 असा दणदणीत पराभव केला होता. भारतीय महिला हॉकी संघाने रॉऊंड रॉबिन टप्प्यात आपले सर्व सामने जिंकून पाच सामन्यातून 15 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे. कोरियाचा संघ राऊंड रॉबिन टप्प्यात चौथ्या स्थानावर असून त्यांनी दोन सामने जिंकले असून दोन सामने गमवले आहेत. तर एक सामना बरोबरीत सोडवल्याने त्यांनी 7 गुण मिळवले आहेत. सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी आता केवळ दोन विजय नोंदवणे जरुरीचे आहे.
या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. राऊंड रॉबिन फेरीमध्ये भारताने प्रतिस्पर्ध्यावर 21 गोल नोंदवले तर प्रतिस्पर्ध्यांकडून 3 गोल करवून घेतले आहेत. आतापर्यंत या दोन संघांमध्ये 21 सामने झाले असून त्यापैकी कोरियाने 12 तर भारताने 6 सामने जिंकले आहेत. तीन सामने मात्र अनिर्णित राहिले आहेत.









