वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी येथे भारताचा सलामीचा सामना कोरियाबरोबर होत आहे. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने यापूर्वी ही स्पर्धा दोन वेळेला जिंकली होती.
भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने यापूर्वी म्हणजेच 2001 साली होबार्टमध्ये तर त्यानंतर 2016 साली लखनौ येथे झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले होते. त्याशिवाय भारतीय संघाने 1997 साली इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. दोन वर्षांपूर्वी सदर स्पर्धा भुवनेश्वरमध्ये खेळविली गेली होती. यजमानपद भूषविणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही आणि त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचा क गटात समावेश असून यामध्ये कॅनडा, स्पेन आणि कोरिया या संघांचा सहभाग आहे. भारताचा या गटातील पहिला सामना मंगळवारी बलाढ्या कोरियाबरोबर होणार असून त्यानंतर भारताचा दुसरा सामान येत्या गुरुवारी स्पेनबरोबर तर येत्या शनिवारी त्यांचा तिसरा सामना कॅनडाबरोबर होईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व आघाडी फळीत खेळणाऱ्या उत्तमसिंगकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले संघ चार गटात विभागण्यात आले आहेत. अ गटामध्ये माजी विजेते अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, चिली, मलेशिया, ब गटात इजिप्त, फ्रान्स, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका, ड गटात बेल्जियम, नेदरलँड्स, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. प्राथमिक फेरी झाल्यानंतर प्रत्येक गटातील आघाडीचे पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने 12, उपांत्य फेरीचे सामने 14 तर अंतिम सामना 16 डिसेंबरला खेळविला जाईल. भारतीय कनिष्ठ पुरूष हॉकी संघाला सीआर. कुमार हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाने गेले काही दिवस कसून सराव केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.









