वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2036 साली होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपली उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर यांनी मंगळवारी येथे प्रसारमाध्यमाला दिली. पुढील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भारताकडून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी यजमानपदाकरिता लेखी स्वरुपात अर्ज सादर केला जाईल.
2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी भारतीय शासनाकडून पूर्ण पाठिंबा दर्शवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गुजरातमधील अहमदाबाद या स्पर्धेचे प्रमुख शहर राहिल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अहमदाबाद शहरामध्ये जागतिक दर्जाचे क्रीडा केंद्र उपलब्ध केले जातील. यापूर्वी 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमान भारताला मिळाले होते. 2032 पर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमान यापूर्वीच निश्चित झाले आहेत. आयओसीसमवेत गुजरात शासनाने क्रीडा संदर्भातील विविध ठिकाणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पूर्वतयारीकरिता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी चर्चा सुरू केली आहे. अहमदाबादमध्ये 4600 कोटी रुपये खर्च करून 236 एकरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज ठेवण्याचे आमचे प्रयत्न चालू असल्याचे ठाकुर यांनी सांगितले. 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणाऱया योनेक्स सनराईज इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारताने स्वीकारले आहे. तसेच 15 ते 31 मार्च दरम्यान आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेची महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा आणि 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान आशियाई कुस्ती स्पर्धा भारतात होणार आहेत. या तिन्ही स्पर्धांमध्ये चीनच्या खेळाडूंचा सहभाग अधिक राहू शकेल. विश्व मुष्टीयुद्ध आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत पाकचे स्पर्धकही सहभागी होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.









