वृत्तसंस्था / हांगझोयु
महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सुपर-4 फेरीतील शेवटचा सामन्यात जपानने भारताला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. हा सामना अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय महिला हॉकी संघाच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या आशा अद्याप जीवंत राहिल्या आहेत.
या स्पर्धेत आता सुपर-4 फेरीतील पुढील सामन्यात यजमान चीनने कोरियाचा पराभव केला किंवा त्यांनी आपला संभाव्य पराभव 3 गोलांच्या फरकाने कमी राखला तर भारताला अंतिम फेरीत स्थान मिळू शकेल. शनिवारचा भारत आणि जपान यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. सामन्यातील सातव्याच मिनिटाला ब्युटी डुंगडुंगने भारताचे उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने जपानवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास केवळ दोन मिनिटे बाकी असताना शिहो कोबायाकेवाने शानदार गोल नोंदवून जपानला बरोबरी साधून दिली. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. भारतीय संघातील इशिका चौधरीने मारलेला फटका जपानच्या गोलपोस्टला आदळून बाहेर गेला. त्यानंतर मात्र जपानने सांघिक खेळावर अधिक भर देत भारतावर चढाया सुरू केल्या. नेहाने दिलेल्या पासवर ब्युटी डुंगडूंगने सातव्या मिनिटाला जपानच्या बचाव फळीतील खेळाडूंना तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीतील शेवटच्या काही सेकंदांमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचा लाभ भारतीय खेळाडूंना घेता आला नाही. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत जपानने आपली आक्रमने अधिक भेदक केली आणि त्यांना या कालावधीत पेनल्टी कॉर्नरही मिळाला. भारतीय गोलरक्षकाने जपानचा हा पेनल्टी कॉर्नर थोपविला. मध्यतंराला 5 मिनिटे बाकी असताना जपानच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी भारतीय बचाववर चांगलेच दडपण आणले. पण त्यांना आपले खाते उघडता आले नाही. सामन्याच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघातील लालरेमसियामीने काही चढाया केल्या पण भारताची आघाडी तिला वाढविता आली नाही. सामन्याच्या शेवटच्या सत्रामध्ये दोन्ही संघाच्या बचावफळींची कामगिरी अत्यंत मजबूत झाली. 58 व्या मिनिटाला जपानच्या कोबायाकेवाने भारतीय बचावफळींतील खेळाडूंना हुलकावणी देत गोल केला. अखेर हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.









