वृत्तसंस्था /चेन्नई
येथे सुरू असलेल्या 2023 च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी यजमान भारत आणि जपान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दर्जेदार खेळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यजमान भारत हा संघ सुरुवातीपासूनच संभाव्य विजेता म्हणून ओळखला जातो. भारतीय हॉकी संघाने या स्पर्धेला सुरुवातीपासूनच दर्जेदार कामगिरी करत राऊंड रॉबिन टप्प्यापर्यंत एकही सामना गमवलेला नाही. भारतीय हॉकी संघाने राऊंड रॉबिन टप्प्यात चार सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत राखत गुणतक्त्यात आघाडीचे स्थान पटकावले आहे. भारत आणि जपान या दोन संघातील यापूर्वी झालेल्या राऊंड रॉबिन सामन्यात जपानने भारताला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. आता पुन्हा या दोन संघामध्ये शुक्रवारी उपांत्य फेरीत दुसऱ्यांदा गाठ पडत आहे. भारताची आघाडी फळी या सामन्यात आपल्या डावपेचात बदल करून वेगवान खेळावर भर देतील. हॉकी मानांकनात या दोन्ही संघामध्ये खूपच फरक आहे. भारत सध्या चौथ्या तर जपान 19 व्या स्थानावर आहे. दरम्यान ढाक्का येथे 2021 साली झालेल्या आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात जपानने भारताचा 5-3 असा पराभव केला होता. भारतीय संघाला या पराभवाची निश्चितच आठवण असेलच. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात भारतीय संघ गाफील राहण्याची चूक करणार नाही.
चेन्नईत सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने राऊंड रॉबिन टप्प्यापर्यंत झालेल्या सामन्यात सर्वाधिक म्हणजे 20 गोल नोंदवले आहेत. राऊंड रॉबिन पद्धतीच्या झालेल्या जपानविरुद्धच्या सामन्यात भारताला 15 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते पण त्यापैकी एका कॉर्नरवर भारताला गोल नोंदवला आला होता. प्रशिक्षक फुल्टॉन यांनी भारतीय संघातील खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवण्याचा सराव चांगलाच करवून घेतला आहे. बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने 4-0 अशा एकतर्फी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने शेवटपर्यंत पाकला गोल करण्यापासून रोखण्यात यश मिळवले होते. शुक्रवारच्या जपानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघातील खेळाडू कोणतेही मानसिक दडपण न घेताना दर्जेदार खेळ करतील असा विश्वास प्रशिक्षक फुल्टॉन यांनी व्यक्त केला आहे. उपकर्णधार हार्दिक सिंग यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत जपानने सरस गोल सरासरीच्या जोरावर पाकिस्तानला मागे टाकत उपांत्य फेरी गाठला आहे. या दोन्ही संघांनी समान पाच गुण मिळवले होते. जपान संघाची या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी आत्मविश्वास वाढवणारी झाली आहे. त्यांनी राऊंड रॉबिन टप्प्यात केवळ चीनविरुद्धचा एकमेव सामना जिंकला तर दोन सामने बरोबरीत राखले आणि एक सामना गमवला. शुक्रवारी भारत आणि जपान यांच्यात होणाऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी मलेशिया आणि विद्यमान विजेता दक्षिण कोरिया यांच्यात पहिली उपांत्य लढत खेळवली जणार आहे. मलेशियाने आतापर्यंत राऊंड रॉबिन टप्प्यात चार सामने जिंकले असून एक सामना गमवला आहे. त्यामुळे उपांत्य लढतीत द. कोरियाच्या तुलनेत मलेशियाचे पारडे थोडे जड वाटते.









