जपानला टाकले पिछाडीवर : 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या स्थानी पोहोचणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार ही गती अशीच राहिली तर भारत पुढील 2-3 वर्षांत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
भारत अधिकृतपणे जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताने आपल्या आर्थिक धोरणामुळे हे यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील (आयएमएफ) आकडेवारीचा हवाला देत ‘आपली अर्थव्यवस्था आता चौथी सर्वात मोठी बनली आहे. भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. आज भारत जपानपेक्षा मोठा आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी भारतापेक्षा मोठे आहेत,’ असे नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम म्हणाले. जर आपण आपल्या योजना आणि कल्पनांवर ठाम राहिलो तर आपण अडीच ते तीन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयएमएफच्या एप्रिल 2025 च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालानुसार, भारताचा नाममात्र जीडीपी 4.187 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हा अंदाज जपानच्या 4.186 ट्रिलियन डॉलर्सच्या अंदाजित जीडीपीपेक्षा किंचित जास्त आहे. भारताची ही कामगिरी मजबूत देशांतर्गत मागणी, अनुकूल लोकसंख्याशास्त्राrय ट्रेंड आणि धोरणात्मक सुधारणांमुळे आहे. भारताची अर्थव्यवस्था वार्षिक 6-7 टक्के इतका वाढीचा दर राखत आहे. तर, दुसरीकडे जागतिक व्यापार तणाव आणि धोरणात्मक बदलांमुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.
जागतिक परिस्थिती बदलणार
भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याने जागतिक स्तरावर खालीलप्रमाणे अनेक परिणाम दिसून येणार आहेत. जागतिक पातळीवर भारताचा डंका सुरू असून अनेक क्षेत्रामध्ये भारत आघाडीवर झेप घेत आहे. आता अर्थव्यवस्थेच्या बाबतीत नवी मजल गाठल्याने अनेक देश व्यापार व गुंतवणुकीसाठी भारताकडे आकर्षित होऊ शकतात.
तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने झेप
आयएमएफ आणि इतर जागतिक संस्थांच्या अंदाजानुसार, जर भारताचा सध्याचा विकास दर असाच चालू राहिला तर भारत 2028 पर्यंत जर्मनीला (4.9 ट्रिलियन जीडीपी) मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. भारताचा जीडीपी 2027 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्स आणि 2028 पर्यंत 5.58 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यानंतर, फक्त अमेरिका (30.51 ट्रिलियन डॉलर्स) आणि चीन (19.23 ट्रिलियन डॉलर्स) भारताच्या पुढे असतील. भारताचा विकास दर 2025 मध्ये 6.2 टक्के आणि 2026 मध्ये 6.3 टक्के राहण्याची शक्यता आहे. यावरून भारत आता केवळ लोकसंख्येच्या बाबतीतच नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही जगात आघाडीवर राहण्याच्या शर्यतीत आहे.
पत वाढल्याचे परिणाम…
जागतिक प्रभावात वाढ : जी-20 आणि आयएमएफ सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा प्रभाव वाढेल.
गुंतवणूक वाढणार : जागतिक कंपन्या भारताकडे एक आकर्षक बाजारपेठ म्हणून पाहत असल्याने भारतातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणखी वाढेल.
प्रादेशिक स्थिरता : भारत आणि जपानदरम्यानच्या चांद्रयान-5 आणि लष्करी सहकार्य यासारख्या मजबूत धोरणात्मक भागीदारीमुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता वाढेल.
आर्थिक नेतृत्व : या यशामुळे भारत जागतिक आर्थिक नेतृत्वाच्या जवळ आला आहे. जर भारताने 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकले तर आपले नेतृत्व अधिक मजबूत होईल.
जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्था…
अमेरिका 30.51 ट्रिलियन डॉलर्स
चीन 19.23 ट्रिलियन डॉलर्स
जर्मनी 4.74 ट्रिलियन डॉलर्स
भारत 4.187 ट्रिलियन डॉलर्स
जपान 4.186 ट्रिलियन डॉलर्स









