आयजीएन अध्यक्षांनी केली भूमिका स्पष्ट
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुरक्षा परिषदेत सुधारणांवर इंटरनॅशनल निगोशिएशन्सचे (आयजीएन) तारिक अलबनई यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत विस्तार झाल्यास भारत सदस्यत्वाचा मुख्य दावेदार राहणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
सुरक्षा परिषदेचे लक्ष्य प्रतिनिधित्व पूर्ण असणे असायला हवे. भारत सध्या जागतिक व्यासपीठावर एक प्रमुख देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे 193 सदस्य आहेत. सुरक्षा परिषदेचा विस्तार हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांसाठी प्रतिनिधित्वपूर्ण असल्याचे अलबनई यांनी म्हटले आहे. सुरक्षा परिषदेच्या विस्ताराचा निर्णय झाल्यास सदस्यांची संख्या 21 वरून वाढत 27 केली जाऊ शकते, अशा स्थितीत निश्चितपणे भारत यात दावेदार असेल आणि व्यापक सदस्यत्वाच्या निर्णयाच्या अधीन असेल. सुधारणांचा मार्ग जटिल असला तरीही आम्ही पुढे जाण्याच्या दिशेने स्थिर आणि सार्थक पावले उचलत आहोत असे अलबनई यांनी म्हटले आहे.
1965 मध्ये निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वृद्धीसोबत सुरक्षा परिषदेचा पहिला टप्पा 80 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत चालला आहे. सुधारानंतर परिषद जे रुप धारण करणार आहे, ते पुढील शतकापर्यंत टिकण्याच्या दृष्टीकोनातून ठरविले जावे, तसेच ते समावेशकता, पारदर्शकता, दक्षता, प्रभावशीलता, लोकशाही आणि उत्तरदायित्वाच्या तत्वांच्या आधारावर असायला हवे असे अलबनई यांनी म्हटले आहे.
सर्वसंमतीसाठी प्रयत्न
विस्तारित सुरक्षा परिषदेत किती सदस्य असावेत यावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही, परंतु 21-27 सदस्य देश असावेत अशी चर्चा सुरू आहे. भारताची भूमिका नेहमीच चर्चा लवकरात लवकर पुढे नेण्याची राहिली आहे. आताच्या अधिवेशनात सदस्य देशांकडून दाखविण्यात आलेल्या वेगाला पाहून आम्ही उत्साहित आहोत. सुधारणेच्या भावनेसाठी साहस आणि रचनात्मकता दोन्हींची आवश्यकता असते आणि सर्व प्रतिनिधिमंडळांची सक्रीय भागीदारी आवश्यक आहे, कारण आम्ही सुरक्षा परिषद सुधारणंच्या मुख्य तत्वांवर सर्वसंमती निर्माण करण्यासाठी काम करत आहोत असे उद्गार अलबनई यांनी काढले आहेत.
निश्चित कालावधी सांगणे अवघड
सुरक्षा परिषदेत सुधारणा 2023 पर्यंत होणार का हे मी सांगू शकत नाही, परंतु सुधारणांकरता निर्माण झालेले अडथळे दूर करण्यावरून मी अत्यंत सकारात्मक आहे. काहीतरी वेगळे करण्याची गरज असल्याचे लोक समजू लागले आहेत. तसेच शांतता, सुरक्षा, विकास आणि मानवाधिकारांसमवेत सर्व मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठी जागतिक समुदायाकडे हाच एकमेव मार्ग असल्याचे सदस्य देशांना कळून चुकले आहे. एक प्रभावी संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून काम करत आहोत. सुरक्षा परिषदेत सुधारणांची प्रक्रिया याचाच एक अविभाज्य भाग असल्याचे अलबनई यांनी नमूद केले.









