केंद्रीय मार्गपरिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला शुभारंभ, भारत ठरला जगातील पाचवा देश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या ‘भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम’ (एनसीएपी) या योजनेचा शुभारंभ केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. हे भारताचे स्वत:चे स्वदेशनिर्मिती कार क्रॅश परीक्षण तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान स्वबळावर विकसीत करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे.
भारतात विकल्या जाणाऱ्या कार्स किती सक्षम आणि सुरक्षित आहेत, याची पडताळणी या तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाणार आहे. भारतात आता कार्सचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच महामार्ग आणि मार्गांचे जाळेही विस्तारले आहे. त्यामुळे कार प्रवासात बरीच वाढ झाली असून कार्सच्या सुरक्षितेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरत आहे. साहजिकच, भारताला अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. ती आवश्यकता देशातील संशोधकांनी देशातच पूर्ण केली आहे.
कारनिर्मितीस हातभार
हे तंत्रज्ञान विकसीत केल्यामुळे भारतात निर्माण होणाऱ्या कार्सची निर्यात मोठ्या प्रमाणावर करण्याचाही मार्ग मोकळा होईल. अनेक जागतिक कार निर्मिती कंपन्या आता भारतात आपली उत्पादन केंद्रे स्थापन करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी दहा वर्षांमध्ये भारत जागतिक कार निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र बनू शकतो. हे कार परीक्षण तंत्रज्ञान या प्रक्रियेला मोठा हातभार लावू शकते.
महत्त्वाची उपलब्धी
हे तंत्रज्ञान विकसीत करुन भारताने कारनिर्मिती आणि परीक्षण क्षेत्रातील स्वत:ची क्षमता सिद्ध केल्याचे बोलले जाते. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांनी स्वबळावर हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. जर्मनी, ब्रिटन किंवा फ्रान्सकडेही ते उपलब्ध नाही. हे देश अमेरिकेच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. त्यामुळे भारताचे महत्त्व जगात वाढणार आहे.
काय आहे तंत्रज्ञान
कार किंवा 3,500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे कोणतेही स्वयंचलित वाहन कोणत्याही मार्गांवर किंवा कोणत्याही हवामानात प्रवास करण्यासाठी किती सुरक्षित आणि सक्षम आहे, याची पडताळणी या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूकपणे केली जाते. आतापर्यंत या परीक्षणासाठी भारताला अन्य विकसीत देशांवर अवलंबून रहावे लागत होते. आता ते भारतातच विकसीत झाल्याने भारतातील कोणतीही कार निर्मिती कंपनी आपली वाहने या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या परीक्षणासाठी पाठवू शकते. अटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (एआयएस) 197 या निकषाच्या अनुसार हे परीक्षण केले जाईल. भारतात निर्माण झालेल्या किंवा अन्य देशांमधून भारतात निर्यात करण्यात आलेल्या कार्सचे स्वत:हून परीक्षण करण्याचा अधिकारही या प्राधिकरणाला असेल. ही परीक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आणि संशयातीत अशी असेल. या प्रक्रियेत कार्सची सुरक्षितता आणि सक्षमता यांचे परीक्षण विविध निकषांवर केले जाईल आणि कार्सना त्यानुसार मानांकन किंवा रेटिंग दिले जाईल. एनसीएपीची निर्मिती आंतरराष्ट्रीय निकष आणि गुणवत्ताअंकनानुसार करण्यात आहे. हे तंत्रज्ञान युरो एनसीएपीच्या तोडीस तोड असल्याचे मत अनेक तंत्रज्ञांनी व्यक्त केलेले आहे.
लाभ काय होणार
या तंत्रज्ञानाच्या आधारे परीक्षण करण्यात आलेल्या कार्सची सुरक्षितता आणि सक्षमता यांच्यासंबंधी ग्राहकांच्या मनात कोणताही संदेह राहणार नाही. परीक्षण केलेल्या कार्स खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढणार आहे. तसेच कारचालक आणि प्रवासी यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता यावा, याची सुनिश्चितीही या परीक्षण प्रक्रियेमुळे होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाची वैशिष्ट्यो
ड जागतिक गुणवत्तेचे कार परीक्षण आता भारतनिर्मिती तंत्रज्ञानाने होणार
ड कार चालक आणि कार प्रवासी यांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा
ड हे तंत्रज्ञान स्वबळावर विकसीत करणारा भारत हा जगातील पाचवा देश
ड भारतात कारनिर्मिती उद्योग वधारणार, निर्यातही वाढण्याची दाट शक्यता









