इंग्लंडविरुद्ध आज दुसरी उपांत्य लढत, रोहित, राहुल यांच्यावर भिस्त
वृत्तसंस्था/ ऍडलेड
दुसऱया टी-20 वर्ल्ड कप जेतेपदापासून केवळ दोन पावले दूर असणाऱया भारताची बलाढय़ इंग्लंडविरुद्ध दुसरी उपांत्य लढत आज गुरुवारी येथे होत असून यासाठी भारताला कोणतीही चूक न होण्याची दक्षता घेण्याची गरज आहे. दुपारी 1.30 पासून या लढतीला सुरुवात होईल.
सुपर 12 फेरीत भारताची इंग्लंडच्या तुलनेत सरस कामगिरी झाली असून या लढतीत दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विजयी संघ अंतिम फेरी गाठणार असून दोन्ही संघांना दुसऱयांदा जेतेपदाची संधी मिळणार आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने आपल्या संघाने आतापर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन केलेले नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांचा कर्णधार जोस बटलर व बेन स्टोक्स यांना या लढतीत मोठी खेळी करता येणार नाही, यासाठी भारताला उपाययोजना करावी लागेल.

आयसीसी स्पर्धांतील इंग्लंडविरुद्धचा इतिहासही भारताच्या विरोधात आहे. 2013 नंतर आयसीसी स्पर्धेतील शेवटच्या दोन पायऱया पार करण्यासाठी भारताला झगडावेच लागले आहे. 2014 टी-20 विश्वचषक फायनल, 2016 टी-20 विश्वचषक उपांत्य फेरी, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल व 2019 वनडे वर्ल्ड कप उपांत्य फेरी यांचा त्यात समावेश आहे. या सर्व सामन्यात रोहित शर्माने भाग घेतला असला तरी त्यावेळी तो कर्णधार नव्हता. त्यामुळे त्या अपयशाचे ओझे त्याच्यावर असणार नाही. तो आता पूर्ण वेळ कर्णधार आहे. मात्र यावेळी त्याची कामगिरी प्रभावी झाली नसून त्याने एका अर्धशतकासह फक्त 89 धावा जमविल्या आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी सरावावेळी झालेली किरकोळ दुखापत विसरून त्याला मार्क वुड किंवा ख्रिस जॉर्डन यासारख्या गोलंदाजांविरुद्ध पुलचे फटके वारंवार वापरावे लागतील. नीरस प्रदर्शन झाल्याने त्याच्यावर टीका होत असून त्यांची तेंडे बंद करण्यासाठी त्याला ही योग्य संधी मिळाली आहे.

विराट कोहली आदिल रशिदविरुद्ध हिशोब चुकता करण्याचा विचार करेल तर सॅम करनच्या कटर्सविरुद्ध सूर्यकुमार यादवचे कौशल्य यांच्यातील जुगलबंदी पाहण्याची संधी असेल. अष्टपैलू बेन स्टोक्स व भारताचा हार्दिक पंडय़ा यांच्यातही आपापल्या संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी चुरस असेल. हार्दिकने मोठे योगदान दिलेले नसले तरी फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीत त्याने काही सामन्यात उपयुक्त योगदान दिले आहे. टी-20 च्या जागतिक क्रमवारीत भारत नंबर वन असून इंग्लंड दुसऱया स्थानावर आहे. येत्या रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून जगभरातील चाहत्यांना भारत व पाकिस्तान यांच्यात जेतेपदाची लढत पाहण्याची इच्छा आहे. पाकने उपांत्य सामना जिंकून अंतिम फेरी गाठली असून आता भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंत की कार्तिक?
सुपर 12 फेरीत भारताने चार सामने जिंकले. मात्र पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱया दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. आक्रमण करावे की बचाव करावा, अशी त्यांची गोंधळलेली स्थिती झाली आहे. कमी अंतरावरील सीमारेषा व रशिदची लेगब्रेक गोलंदाजी याचा विचार करता पंतची निवड येथे योग्य ठरणारी आहे. पण प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा फिनिशर दिनेश कार्तिकवर जास्त विश्वास असल्याने ते काय करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. अक्षर पटेलकडून अपेक्षापूर्ती झालेली नाही. पण संघव्यवस्थापनाने यजुवेंद्र चहलची निवड करण्याचे धाडसही दाखविलेले नाही. चहलचा समावेश भारतासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण वापरलेल्या खेळपट्टीवर सामना होणार असल्याने फिरकी गोलंदाजी सामन्याच्या निकालावर परिणाम करणारी ठरेल.
या स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज मार्क वुड या सामन्यात खेळू शकला नाही तर ते भारताच्या पथ्यावर पडेल. कारण जॉर्डन किंवा टायमल मिल्स यांच्यात भारतीय फलंदाजी लाईनअपला रोखण्याइतकी आग नाही. स्टोक्स व करन यांनी मात्र प्रभावी कामगिरी केली असून भारताला प्रथम फलंदाजी देत आव्हानाचा पाठलाग करणे त्यांना आवडेल. बटलर, हॅलेस, लिव्हिंगस्टोन यांच्यात कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. मात्र महत्वाचा सामना असल्याने आव्हान छोटे असल्यास पाठलाग करताना दडपण कमी होण्यास मदत होईल. या मैदानावर किमान 170 धावा आव्हानात्मक ठरण्याची अपेक्षा आहे. सूर्या व कोहली अपयशी ठरल्यास रोहित, कार्तिक, पंत, राहुल यांना त्यांची भरपाई करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर, अर्शदीत सिंग, शमी, दीपक हुडा, हर्षल पटेल, पंत, यजुवेंद्र चहल.
इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), स्टोक्स, ऍलेक्स हॅलेस, हॅरी बुक, फिल सॉल्ट, डेव्हिड मलान, सॅम करन, मार्क वुड, मोईन अली, आदिल रशिद, टायमल मिल्स, जॉर्डन, लिव्हिंगस्टोन, वोक्स, डेव्हिड विली.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
कोहलीलाही चेंडूचा मार, पण पूर्ण फिट
बुधवारी सरावावेळी स्टार फलंदाज विराट कोहलीला हर्षल पटेलचा वेगवान चेंडू लागून दुखापत झाली. पण थोडय़ाच वेळात तो पुन्हा सरावास आल्यानंतर सर्वाना हायसे वाटले. मंगळवारी रोहित शर्माच्या हातावरही चेंडू लागून दुखापत झाली होती. पण अर्धा तास बर्फाचा उपचार केल्यानंतर तो पुन्हा सरावास आला होता. दोघेही पूर्ण फिट असल्याचे रोहितने बुधवारी सांगितले.
भारत-इंग्लंड यांच्यातील शेवटच्या 5 सामन्यांची आकडेवारी
10 जुलै 22 इंग्लंड 17 धावांनी विजयी
9 जुलै 22 भारत 49 धावांनी विजयी
7 जुलै 22 भारत 50 धावांनी विजयी
20 मार्च 21 भारत 36 धावांनी विजयी
18 मार्च 21 भारत 8 धावांनी विजयी.









