वृत्तसंस्था/ ब्लोमफौंटेन (दक्षिण आफ्रिका)
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरूषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवा संघाने आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले असून त्यांचा मंगळवारी येथे अ गटातील सामना न्यूझीलंड बरोबर होणार आहे. भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यावर अधिक भर देईल. हा सामना सुपर सिक्स टप्प्यातील राहिल. अ गटात भारताने पहिले स्थान मिळविले असून त्यांनी यापूर्वीच सुपर सिक्स फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत न्यूझीलंडचा यापूर्वीचा सामना ईस्ट लंडनमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांना मंगळवारच्या सामन्यासाठी थोडी घाई करावी लागेल. ब्लोमफौंटेनमधील वातावरण तसेच खेळपट्टी यांच्याशी जुळवून घेताना न्यूझीलंडला कसरत करावी लागेल. या स्पर्धेत भारतीय युवा संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा तर तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. भारतीय युवा संघाने आतापर्यंत आयसीसीची ही स्पर्धा पाच वेळेला जिंकली आहे. भारतीय संघातील अर्शिन कुलकर्णी तसेच मुंबईच्या सर्फराज खानचा लहान भाऊ मुशीर खान यांच्याकडून फलंदाजीत सातत्याने अधिक धावा जमविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेमध्ये मुशीर खानने सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसरे स्थान मिळविले असून आतापर्यंत त्याने तीन सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकवले आहे. अर्शीन कुलकर्णीने यापूर्वी एक शतक झळकवले आहे. भारतीय संघातील आणखी एक फलंदाज आदर्श सिंग याच्याकडून मंगळवारच्या सामन्यात अधिक धावांची अपेक्षा बाळगली जात आहे. कर्णधार उदय सहारनने फलंदाजीत आपले. सातत्य राखले आहे. नमन तिवारी हा भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने दोन सामन्यात 4 गडी बाद केले. तर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याला यश मिळू शकले नाही. भारतीय संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज सौमी पांडेने आतापर्यंत 3 सामन्यात 8 गडी बाद करताना किफायतशीर गोलंदाजी केली आहे.
न्यूझीलंड संघाने या स्पर्धेत आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले असून हा संघ ड गटात दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजीची सत्वपरीक्षा ठरेल. न्यूझीलंडने अफगाण विरुद्धचा सामना थोडक्यात जिंकला होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. पाकने या लढतीत न्यूझीलंडचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला होता.
भारत – उदय सहारन (कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रूद्रमयुर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलीया, मुशीर खान, अरवेली राव, सौमी पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, ए. शुक्ला, राज लिंबानी आणि नमन तिवारी.
न्यूझीलंड – ऑस्कर जॅक्सन (कर्णधार), मेसॉन क्लॉर्क, सॅम क्लोडी, झॅक कमिंग, रेहमान हिकमत, टॉम जोन्स, जेम्स निल्सन, स्नेहित रे•ाr, मॅट रो, स्व्रुडेर, स्टॅकपोल, ऑलिव्हर तेवातिया, अॅलेक्स थॉमसन, रियान सोरगेस आणि ल्युक वॅटसन.









