जयशंकर यांच्याशी चर्चेनंतर अमेरिकेचे परराष्ट मंत्री मार्को रुबिओ यांची प्रतिक्रिया, चर्चेवर भारत संतुष्ट
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारत आणि अमेरिका यांच्यात घनिष्ट संबंध असून भारत आमचा मूल्यवान धोरणात्मक भागीदार देश आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केली आहे. जुलैनंतर प्रथमच दोन्ही नेत्यांची भेट झाली असून त्यांनी द्विपक्षीय संबंध, जागतिक परिस्थिती, प्रशांत भारतीय क्षेत्र, भारत-अमेरिका व्यापार करार आणि एच वन बी व्हिसा आदी मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रसंघच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या परिषदेच्या निमित्ताने त्यांनी अमेरिकेचे मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली आहे. गेल्या जुलैमध्ये दोन्ही नेते क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने एकमेकांना भेटले होते. नंतरच्या काळात अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांचे व्यापारी शुल्क लावले. तसेच काही दिवसांपूर्वी एच वन बी व्हिसाचे शुल्क प्रचंड प्रमाणात वाढवून ते सध्याच्या शुल्काच्या वर 1 लाख डॉलर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयांमुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट महत्वपूर्ण मानण्यात येत असून चर्चा सकारात्मक होती, असे दोन्ही नेत्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.
व्यापार करारावर प्रगती
भारत आणि अमेरिका यांच्यात गेले सहा महिने एका सर्वंकष व्यापार करारावर चर्चा होत आहे. मधल्या तीन महिन्यांच्या काळात ही चर्चा थंडावली होती. तथापि, दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताशी असलेल्या मैत्रीचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे परममित्र आहेत. भारताशी व्यापार करार होणे ही शक्य बाब आहे, असाही संदेश त्यांनी प्रसारित केला. त्यामुळे थंडावलेली व्यापार चर्चेला पुन्हा प्रारंभ झाला आहे. अमेरिकेचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात येऊन गेले असून भारताचे व्यापार मंत्री पियूष गोयल हे लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा होत असून लवकरच तो होणे शक्य आहे, असे मानले जात आहे.
व्यापारासंबंधीही चर्चा
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारासंबंधीही जयशंकर आणि रुबिओ यांनी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशांत भारत क्षेत्र मुक्त आणि स्वतंत्र असावे, या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात एकमत आहे. क्वाडच्या माध्यमातून भारत अमेरिकेशी यासंदर्भात सहकार्य करीत आहे, असेही रुबिओ यांनी त्यांच्या भेटीनंतरच्या संदेशात स्पष्ट केले आहे. मात्र, व्यापार करार केव्हा होणार, या संबंधी अद्याप स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही. तरीही गेल्या दोन आठवड्यांमध्ये दोन्ही देशांचे व्यापारी संबंध पूर्ववत होण्याची शक्यता दिसू लागली आहे. परिणामी, जयशंकर आणि रुबिओ यांची चर्चा महत्वाची ठरत आहे.
एच वन बीच्या अटी चर्चेनंतर शिथील ?
अमेरिकेने एच वन बी व्हिसावर सध्याच्या शुल्कासह आणखी 1 लाख डॉलर्सचे शुल्क लावले आहे. या व्हिसा पद्धतीचा सर्वाधिक लाभ आजवर भारताला मिळाला आहे. तथापि, या शुल्कामुळे उच्चशिक्षित भारतीयांचा अमेरिकेत कामासाठी जाण्याचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. भारताच्या अधिकाऱ्यांनी भारतातून आणि अमेरिकेतही यासंबंधी अमेरिकेच्या धोरणकर्त्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर अमेरिकेने या शुल्कासंबंधी स्पष्टीकरण देत अमेरेकेला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना काही प्रमाणात दिलासा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हे शुल्क सध्या असलेल्या व्हिसाधारकांसाठी नाही. तसेच व्हिसाचे नूतनीकरण करतानाही ते भरावे लागणार नाही. ते कंपन्यांकडून घेतले जाणार आहे, असे स्पष्टीकरण दिले गेले.
चर्चा समाधानकार झाल्याची प्रतिक्रिया
ड जयशंकर-रुबिओ चर्चा सकारात्मक आणि समाधानकारक झाल्याचे वृत्त
ड व्यापार करार, एच वन बी व्हिसासह सर्व मुख्य मुद्द्यांवर नेत्यांची चर्चा
ड भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारच्या दिशेने बऱ्यापैकी प्रगती
ड प्रशांत भारत क्षेत्रासंबंधी भारत आणि अमेरिका सहकार्य करीतच राहणार









