वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत देश आता पहिल्यासारखा दुर्बळ राहिलेला नसून तो त्याच्यावरील कोणत्याही हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यास सज्ज आहे. काँग्रेसच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. तथापि, हल्लेखोरांवर किंवा त्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातील भारताने मात्र बालाकोट आणि उरी येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पुरेपूर प्रतिशोध घेतला, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.
शनिवारी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. विरोधी पक्ष सत्तेवर असतानाच्या काळात निष्क्रीय असणारा भारत आता, हातपाय हलविणारा देश म्हणून जगात ओळखला जात आहे. या देशातील युवकांना आता यंत्रणा आणि व्यवस्था यांच्या संदर्भात विश्वास वाटू लागला असून त्यामुळे त्यांच्यात देशासाठी सकारात्मक कामगिरी करुन दाखविण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला धाडसी आणि ठाम निर्णय घेणारे नेते भारताला लाभले आहेत, असे महत्वपूर्ण प्रतिपादन जयशंकर यांनी केले.
विकसीत होण्याची आस
आज भारताच्या युवावर्गाला देशाला विकसीत राष्ट्र बनविण्याची आस लागून राहिली आहे. त्यासाठी कष्ट करण्यास युवावर्ग सज्ज आहे. आज देशाचा व्यापार 40 अब्ज डॉलर्सवरुन 80 अज्ब डॉलर्सपर्यंत पोहचला आहे. तर 1991-1992 या वर्षी असणारा अर्थव्यवस्थेचा 2,500 कोटी डॉलर्स असणारा आकार आता 4 लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहचल्याची माहितीही जयशंकर यांनी यावेळी दिली.









