अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये कुवेतवर 5-4 गोलफरकाने मात
क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
बेंगलोरच्या श्री कंठिरेवा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये बलाढ्या कुवेतचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव करून जेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत व जादा वेळेतही उभय संघांत 1-1 अशी बरोबरी झाली होती. भारताने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकून आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली. सुनील छेत्रीला गोल्डन बुट व गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला. निर्धारित वेळेतील चौदाव्या मिनिटाला कुवेतने आघाडी घेतली तर 39 व्या मिनिटाला लालियानझुआला छांगटेने भारताला बरोबरी साधून दिली.
पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांची 4-4 अशी बरोबरी झाल्यानंतर सडनडेथचा अवलंब करण्यात आला. महेश नाओरेमने भारताचा गोल नेंदवल्यानंतर गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने खालेद हाजिआहचा फटका अचूक अडवित भारताचे जेतेपद निश्चित केले.
दोन्ही संघांनी अंतिम लढतीत आक्रमक आणि वेगवान खेळ केला. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला भारताला आघाडी घेण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र यावेळी कप्तान सुनील छेत्रीचा जबरदस्त हेडर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाच्या हातात गेला. 14 व्या मिनिटाला कुवेतने गोल करून आघाडी घेतली. यावेळी अल खलदीने मारलेला फटका भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगला भेदून जाळीत विसावला. या गोलनंतर लगेच दुसऱ्या मिनिटाला छेत्रीने गोल करण्याची संधी गमवली. 31 व्या मिनिटाला गुरप्रीतने आणखी एक संभाव्य गोल टाळला.
प्रत्युत्तरादाखल केलेल्या चालीवर कुवेतचे एक धोकादायक आक्रमण भारताचा डिफेंडर आकाश मिश्राने उधळून लावले.
31 व्या मिनिटाला गोलरक्षक गुरप्रीत सिंगने कुवेतचे आक्रमण परतवताना उत्कृष्ट गोलरक्षण करीत संभाव्य गोल टाळला.
भारताच्या प्रयत्नांना अखेर 38 व्या मिनिटाला यश आले. यावेळी सुनील छेत्री आणि सहाल अहमदने रचलेल्या चालीवर लालियानझुआला छांगटेने कुवेतच्या गोलरक्षकाला वेगळ्या कोंडीन पकडले आणि चेंडूला गोलमध्ये टाकून बरोबरीचा गोल केला.
दुसऱ्या सत्रात कुवेतचे खेळावर वर्चस्व होते. त्यापूर्वी सुनील छेत्रीला कुवेतच्या बचावफळीतील गलथानपणाचा फायदा घेता आला नाही व त्याने सरळ फटका बाहेर मारला. त्यानंतर कुवेतने तीन वेळा गोल करण्याच्या संधी गमवल्या. प्रथम 60 व्या मिनिटाला त्यांच्या अब्दुल्लाहचा गोल करण्याचा यत्न डिफेंडर संदेश झिंगनने हाणून पाडला.
82 व्या मिनिटाला अल-खलाफने अगदी जवळून मारलेला फटका गोलच्या आडव्या पट्टीवरून गेल्याने कुवेतची विजयी गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. खलाफ, अब्दुलाह व रशीदीने या त्रिकुटाने भारताच्या बचावफळीवर शेवटच्या दहा मिनिटांत चांगलाच दबाव आणला मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले.









