ओपन एआयचे सीईओ सॅम आल्टमन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली :
कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आणि ओपन एआयसाठी भारत हा आगामी काळात महत्त्वाचा देश असणार आहे, असे वक्तव्य ओपन एआयचे सीईओ सॅम आल्टमन यांनी भारत भेटीदरम्यान केले आहे.
जगभरामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्व क्षेत्रामध्ये होत असून इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची कामगिरी अधिक सरस ठरत आहे. भारत एआयमध्ये नेतृत्व करण्यासाठी पुढे असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत ते भेटी दरम्यान बोलत होते. चीप व इतर मॉडेल निर्मितीच्याबाबतीमध्ये भारताचे प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ओपन एआयकरिता भारत ही दुसरी मोठी बाजारपेठ राहिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीत व एकंदर बदलामध्ये भारताने नेतृत्व करणे गरजेचे असेल. भारतीयांची सध्याची एआय संदर्भातील कामगिरी ही जागतिक पातळीवर स्पृहणीय नक्कीच ठरलेली आहे.
काय म्हणाले केंद्रीय मंत्री
यावेळी बोलताना केंद्रियमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, कल्पकता ही कोणत्याही देशांमधून जगाच्या पटलावर येऊ शकते व त्यामध्ये भारताने आपला वाटा जरुर उचलण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. भारत याबाबतीत आपली कामगिरी उंचावेल, हे नक्की.









