वृत्तसंस्था/ पुणे
भारताची गांठ आज गुरुवारी येथे होणार असलेल्या विश्वचषकातील सामन्यात बांगलादेशशी पडणार आहे. सध्याच्या फॉर्मचा विचार करता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सहज विजय प्राप्त व्हायला हवा. असे असले, तरी बांगलादेशने गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला तीन वेळा पराभूत केलेले आहे. डिसेंबर, 2022 मध्ये झालेल्या मालिकेत दोनदा तसेच नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात त्यांनी भारताला चकीत करून दाखविलेले आहे. या स्पर्धेत ‘अंडरडॉग्स’नी दिग्गजांना कसा धक्का द्यायचा हे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला नमवून अनुक्रमे अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स यांनी दाखवून दिलेले आहे.
भारत निश्चितच असा धक्का टाळून आपली विजयी घोडदौड कायम राखू पाहेल. फलंदाजीच्या आघाडीवर कर्णधार रोहित आपला दमदार फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर वरच्या फळीतील शुभमन गिल आणि विराट कोहली मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक असतील. रोहित पाकिस्तानविऊद्ध 86 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांच्या शानदार खेळीसह भारताच्या वर्चस्वात आघाडीवर राहिलेला आहे. गुणतालिकेत भारत सध्या अव्वल स्थानावर आहे.
रोहितचा सलामीचा जोडीदार गिल पूर्ण तंदुऊस्त होऊन परतला आहे. कोहली पाकिस्तानविऊद्ध चुकीच्या फटक्यामुळे लवकर बाद झाला असला, तरी त्याने ऑस्ट्रेलियाविऊद्ध 85 आणि अफगाणिस्तानविऊद्ध नाबाद 55 धावा केल्या होत्या. इतरांपैकी श्रेयस अय्यरचे पाकिस्तानविरुद्धचे नाबाद अर्धशतक हे सूचित करते की, भारताची सारी फळी फॉर्मात आली आहे आणि चिंतेचे कारण नाही. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या या स्टेडियमवर भारत फलंदाजीला अनुकूल परिस्थितीचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी झालेल्या सात एकदिवसीय सामन्यांपैकी चार सामन्यांत त्यांनी विजय मिळविलेला आहे.
ऑस्ट्रेलियाला केवळ 199 आणि पाकिस्तानला 191 धावांवर रोखताना गोलंदाजांनी केलेली अव्वल दर्जाची कामगिरी लक्षात घेता बांगलादेशविऊद्ध भारताचे पारडे निश्चितच जड राहील यात शंका नाही. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या वेगवान व फिरकी माऱ्याने प्रभावी कामगिरी केलेली आहे. बांगलादेशसाठी त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि कर्णधार शकीब उल हसनने डाव्या पायाला झालेल्या दुखापतीच्या आव्हानावर मात करणे आणि आज निवडीसाठी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. मंगळवारी संघाच्या सराव सत्रादरम्यान गोलंदाजी न केलेल्या शकिबची बांगलादेशला भारताविरुद्ध लढण्यासाठी आवश्यकता भासेल.
विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत विजय आणि त्यानंतर चांगल्या संघांविरुद्धच्या दोन पराभवांमुळे बांगलादेश काहीसा निराशेच्या स्थितीत आला आहे. अशा परिस्थितीत तिसरा पराभव त्यांना आणखी खचवून जाईल. लिटन दास आणि मेहदी हसन मिराझ यांनी पहिल्या तीन सामन्यांमधून प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे. त्यांच्यासह युवा खेळाडू नजमुल हुसेन शांतो आणि तौहिद हृदोय यांच्याकडूनही अधिक अपेक्षा असतील. मधल्या फळीत केवळ मुशफिकर रहीमने जबाबदारी मोठ्या प्रमाणात पेलली आहे. तस्किन अहमदच्या फॉर्ममध्ये घट झाल्यामुळे गोलंदाजीच्या आघाडीवर संघावरचा दबाव वाढला आहे. या मध्यमगती गोलंदाजाला तीन सामन्यांमध्ये केवळ दोन बळी घेता आले आहेत. मुस्तफिजुर रेहमानसारख्या अनुभवी खेळाडूसाठीही पुनरागमन निराशाजनक राहिलेले आहेत. त्यालाही तीन सामन्यांमध्ये केवळ दोन बळी मिळालेले आहेत.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन व सूर्यकुमार यादव.
बांगलादेश-शकिब उल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रेहमान, हसन महमूद, शरिफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









