केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रे•ाr यांचे प्रतिपादन : जी 20 पर्यटन कृतीगटाच्या बैठकीचे उद्घाटन
पणजी : प्राचीन काळापासून भारतातील प्रवास हा स्वत:चा शोध घेण्याची एक संधी होती आणि जगभरातील पर्यटकांसाठी भारत हे नेहमीच लोकप्रिय ठिकाण राहिले आहे. जी-20 बैठकीच्या निमित्ताने 20 देशांमधील विविध धर्मांच्या लोकांना भारताची संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रे•ाr यांनी केले. जी-20 अंतर्गत आयोजित पर्यटन कृतीगटाच्या चौथ्या बैठकीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना रे•ाr यांनी, गेल्या काही महिन्यांत झालेल्या जी-20 पर्यटन कृतीगटाच्या बैठकांमध्ये जगभरातील तज्ञ आणि नेत्यांसोबत विविध पर्यटन प्रकारांबाबत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. भारताच्या आध्यात्मिक सामर्थ्याचे सौंदर्य, महानता आणि समृद्धता, विविध ठिकाणांचे वैविध्य अनुभवले नसेल तर भारताची भेट अपूर्ण राहील, असे सांगितले.
महिलांच्या दैवी सामर्थ्याची पूजा
आमच्याकडे 50 पेक्षा जास्त शक्तीपीठे असून महिलांच्या दैवी सामर्थ्याची तेथे पूजा करण्यात येते. सुमारे 80 टक्के हिंदू लोकसंख्या असलेला भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे. तसेच बौद्ध आणि जैन धर्माचेही जन्मस्थान आहे. भारतातील 200 मोठे बौद्ध मठ आपल्याला अहिंसेच्या बौद्ध तत्त्वांची आणि निसर्गाबरोबर सुसंवाद राखत जगण्याच्या जैन तत्त्वज्ञानाची शिकवण देतात, असे ते म्हणाले.
सुट्टीसाठी गोवा परिपूर्ण ठिकाण
यावेळी बोलताना श्रीपाद नाईक यांनी सुट्टी घालविण्यासाठी गोवा हे परिपूर्ण ठिकाण असल्याचे सांगितले. येथे प्रसन्न लँडस्केप, समृद्ध समुद्रकिनारे, सोनेरी वाळू, नेत्रसुखद हिरवीगार गावे, सांस्कृतिक इतिहासाचा अप्रतिम संगम आहे. त्याशिवाय पूर्व आणि पश्चिमी संस्कृतींचे अनोखे मिश्रणही आहे, असे सांगितले. देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांमध्ये आता साहसी सागरी पर्यटनाची लोकप्रियता वाढत आहे. त्यातून साहसी पर्यटन स्थळ म्हणून भारताला पसंती मिळणार आहे. भारताची रणनीती साहसी स्थळे विकसित करणे, साहसी पर्यटन, कौशल्य विकास, क्षमता वाढवणे आणि यासंबंधी जाहिरात करतानाच, सुरक्षिततेवर भर देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले.
पर्यटनामुळे अर्थव्यवस्था वाढते
पर्यटन राज्यमंत्री भट्ट यांनी आपल्या भाषणातून, पर्यटनामुळे लोकांना अन्य संस्कृतींबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते तसेच पर्यटनामुळे अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होते, असे सांगितले. पर्यटनामध्ये थरारक अनुभव घेता येतात, आनंद आणि संस्कृतिची देवाणघेवाण होते, त्याचबरोबर समृद्ध करणारे अनुभव मिळतात, असेही ते म्हणाले.
गोवा ‘पर्ल ऑफ द ओरिएंट’
उद्घाटन सत्रात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे गोवा हे ’पर्ल ऑफ द ओरिएंट’ म्हणून प्रसिद्ध असून लाखो पर्यटकांना आकर्षित करत असल्याचे सांगितले. गोवा हे बारामाही पर्यटन स्थळ बनले असून समुद्र किनाऱ्यांनी समृद्ध असे हे नंदनवन प्रत्येकाला भरभरून काहीतरी देते, असेही ते म्हणाले. उद्घाटन सत्रानंतर अर्थात भारतीय उद्योग महासंघातर्फे ‘क्रुझ पर्यटनासाठी भारत हे प्रमुख केंद्र बनविणे’ या विषयावरील चर्चा आयोजित करण्यात आली. त्यावेळी क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन आणि विकास, नदी क्रुझ पर्यटनाचा विकास, क्रुझ पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने यशस्वी पद्धती यावर चर्चा झाली. केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रे•ाr, श्रीपाद नाईक, अजय भट्ट, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यात भाग घेतला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘मेक इन गोवा फॉर द ग्लोब’ या दृष्टिकोनातून गोवा क्रुझ पर्यटनामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रणी भूमिका निभावत असल्याचे सांगितले.









