भारतीय स्वातंत्र्याला 78 वर्षे पूर्ण झाली. अनेक जुन्या-जाणत्या व्यक्तींना स्वातंत्र्य दिनाची देखील आठवण असणार, जो त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला असावा. ब्रिटिश साम्राज्यातून भारत दीडशे वर्षानंतर मुक्त झाला आणि तशी वेळ भारतीय नागरिकांनी, भारतीय सैनिकांनी आणि अर्थात थोर, वीर स्वातंत्र्यसेनानी आणि चळवळीतील व्यक्तींनी ब्रिटिश साम्राज्यकर्त्यांवर आणली. ब्रिटिश संसदेने तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना 1948 पर्यंत भारतीय नागरिकांकडे त्यांची सत्ता सोपविण्याचा आदेश दिला होता मात्र देशातील वाढती बंडाळी आणि त्यातून उद्भवणाऱ्या अनेक गंभीर समस्या तथा सरकारविऊद्ध होणारा उद्रेक यामुळे लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यातून मोकळे करून स्वतंत्र घोषित करण्याचे ठरविले आणि त्यानुसार ते केले. आज या घटनेला 78 वर्षे पूर्ण झाली. आपण स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. आपल्या देशासाठी अनेक विरांनी बलिदान दिलेले आहे. अनेकांनी घरा-दारावर तुळशीपत्र ठेवले आणि देशसेवा करीत राहिले. त्या काळात त्यांनी अत्यंत हाल-अपेष्टा सहन केल्या. तुऊंगवास सहन केले आणि देशातील तमाम नागरिकांना स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी, सरदार भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र पाल, सरोजनी नायडू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल,लाल बहाद्दूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक थोरा-मोठ्यांचे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे योगदान आहे. असे हजारो शूरवीर या देशासाठी आपल्या शरीरात प्राण असेपर्यंत ब्रिटिशांविऊद्ध लढत राहिले. त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी केलेले समर्पण आपणा सर्वांना सातत्याने प्रेरणा देत राहतात. 78 वर्षानंतर आज आपण मागे वळून पाहताना, त्या थोर-वीरांचे बलिदान लक्षात घेणे आवश्यक आहे. भारत आज जगातील तिसरी शक्ती म्हणून पुढे येत आहे आणि त्याची भीती अमेरिकेसारख्या जगातील महाशक्ती असलेल्या व प्रथम क्रमांकाच्या राष्ट्राध्यक्षांना वाटू लागली आहे. त्यामुळे भारतावर अनेक निर्बंध लागू करणे, शेजारी राष्ट्रांना मदत करून भारताविऊद्ध प्रोत्साहन देणे, अशी अनेक कारस्थाने सुरू झाली आहेत. याचाच अर्थ भारत प्रगतीने स्वत:च्या पायावर उभे राहून पुढे गेलेला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला हे सत्य पचविणे कठीण होत आहे. दुर्दैवाने देशात काही राजकीय नेते वैफल्यग्रस्त होऊन विद्यमान मोदी सरकारला सत्ताभ्रष्ट करू पाहत आहेत. संसदेचे कामकाजदेखील चालू द्यायचे नाही, अशा पद्धतीची कारस्थाने करून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपण देशातील नागरिक कैकवेळा एकमेकांच्या विरोधात जातो. मग भाषिक प्रश्न असो किंवा प्रांत प्रश्न असो किंवा अन्य कोणतेही विषय असो, एकमेकांच्या विरोधात जाऊन एकमेकांशी लढा देतो परंतु जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो, देशाचा प्रश्न येतो, त्यावेळी ‘हम सब एक है।’चा नारा लगावणे आवश्यक आहे. आपल्या देशाने काश्मीरमधील ‘370’वे कलम रद्द करून भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळविले. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला योग्य धडा शिकविला. त्यातून बाहेर पडायला व स्वत:ला सावरायला पाकिस्तानला काही वर्षे जावी लागतील मात्र केलेली ही प्रगती काही राजकीय विरोधकांना पचत नाही आणि देशाच्या सार्वभौमत्वाला आपल्या राजकीय इराद्यापोटी आणि राजकीय निराशेपोटी आव्हान देण्यास काही मंडळी पुढे सरली आहेत. आपल्या देशासमोर शेजारील राष्ट्रे आव्हान बनली आहेत. त्याहीपेक्षा आपल्या देशातील काही मंडळी या देशासाठी आव्हान बनत आहेत. भारत आज प्रगतीचे अनेक मजले चढून फार वर पोहोचलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर आपण अनेक चढ-उतार पाहिले. या देशाने पुष्कळ भोगलेदेखील. अनेक वर्षे भारताला दहशतवादाशी मुकाबला करावा लागला. काश्मीर हे एक फार मोठे दुखणे बनून राहिले होते. आज भारताकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत होऊ शकत नाही. याचे कारण या देशाने भक्कम असे नेतृत्व दिले आणि भारत हा अत्यंत मजबूत असा देश बनलेला आहे. जागतिक पातळीवर भारताने फार मोठे नाव कमविले. त्यामुळे आपसुकच आपल्या शत्रूंच्या संख्येमध्ये देखील वाढ होऊ लागली. शत्रुत्वाचे कारण नसते. आपली प्रगती अनेक राष्ट्रांना खुपू लागली आहे. हा देश बलवान आहे, तो सुसंस्कृत आहे. त्याच्याकडे जेवढी राज्य, तेवढ्या भाषा आहेत. विविध पंथांची मंडळी इथे आहेत. या देशात प्रचंड प्रमाणात हिंदू नागरिक आहेत. त्याचबरोबर जगातील सर्वाधिक मुस्लिमांची संख्यादेखील याच देशात आहे. मतभेद होतात पण ‘मनभेद’ होऊ नयेत. यासाठीच ‘राष्ट्र प्रथम’ हे ब्रीद आज प्रत्येकाने राबविण्याची गरज आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील सर्वात मोठे लोकशाहीचे राष्ट्र म्हणून भारताला मान आहे. अशावेळी भारताच्या सार्वभौमत्वाला कुठेही धोका पोहोचणार नाही, यासाठी राष्ट्रातील सर्व मंडळींनी ‘राष्ट्र प्रथम’ हा उद्देश समोर ठेवला तर या देशासमोर अन्य कोणत्याही समस्या राहणार नाहीत. भारताला सर्वात मोठा धोका हा जसा शेजारील राष्ट्रांपासून निर्माण होतोय, दहशतवादापासून निर्माण होतोय, त्याचबरोबर हा देश भ्रष्टाचाऱ्यांनी पोखरून टाकलेला आहे. भ्रष्टाचाराची ही कीड नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी त्याची सुऊवात स्वत:पासून झाली पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य हे आपल्याला काही सहज एक-दोन दिवसात मिळालेले नाही. त्यासाठी दीडशे वर्ष संघर्ष करावा लागलेला आहे. त्यात अनेकांना फाशी झाली, अनेकांनी आपले रक्त सांडले, अनेकांनी बलिदान दिले. भारतीय जनतेवर फार मोठे अत्याचार देखील झाले. तो काळ आणि त्या काळातील जनतेने खूप काही सोसलेले आहे, याचा विसर होऊ नये. ते दिवस आठवले किंवा त्याचे अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आपल्या स्वातंत्र्यवीरांचा त्याग नेहमीच स्मरणात ठेवला पाहिजे. देशात सध्या जे काही चालू आहे ते पाहता, स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग आपण विसरतो आहोत का? अनेकांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळलेले नाही कारण सुखवस्तू कुटुंबातून मंडळी मोठी झालेली असावी परंतु त्यातून जे ज्ञान ते पाजत आहेत, ते देशाला आव्हान देण्याचा प्रकार ठरत आहे. भारताला ‘भारतमाते’चा दर्जा देण्यातही त्यांना राजकारण वाटते, यासारखे दुर्दैव ते दुसरे कोणते? म्हणूनच म्हणावे लागते, ‘यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दुष्ट शत्रू माऊनी तयास देवू आहुती’. शत्रुराष्ट्रांना धडा शिकवून भारताला आणखी दोन पावले पुढे जावेच लागेल. देशाची प्रगती आता जगातील कोणतीही शक्ती रोखून धरणार नाही. भारतीय स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा जगात महाशक्ती बनण्याचा आहे.
Previous Articleबाप्पांच्या उपदेशानुसार योगसाधना करून राजा मुक्त झाला
Next Article राजण्णांच्या राजीनाम्याने राज्यात संघर्ष सुरुच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








