वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका येत्या ऑगस्टमध्ये आयर्लंड येथे खेळवली जाणार आहे. ही मालिका आयर्लंडमधील मालहिदे येथे होणार असल्याची घोषणा क्रिकेट आयर्लंडतर्फे करण्यात आली.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या टी-20 संघाने गेल्या वर्षी मालहिदे येथे दोन सामन्यांची मालिका खेळली होती. भारताने ती 2-0 अशी एकतर्फी जिंकली होती. आयर्लंडमधील क्रिकेट शौकिनांनी या मालिकेचा पुरेपूर आनंद उपभोगला. आयर्लंडमधील क्रिकेट शौकिनांना पुन्हा अशी संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आयर्लंड आणि भारतीय क्रिकेट मंडळाने ही मालिका आयोजित करण्यात यश मिळवले आहे.
चालू वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असून खेळाडूंना दुखापती होऊ नयेत याची काळजी आतापासूनच घेत आहे पण भारतीय क्रिकेट मंडळाने आयर्लंडमधील या मालिकेला अधिकृत मान्यता दिली आहे. आयर्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. येत्या जूनमध्ये भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत अंतिम फेरीसाठी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.









