
वृत्तसंस्था /डब्लिन
भारताची आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका आज शुक्रवारपासून सुरू होत असून मैदानाबाहेर पडल्यानंतर जवळपास 11 महिन्यांनी जसप्रीत बुमराह त्यात भारताचे नेतृत्व करणार असल्याने सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतील. या मालिकेत सदर वेगवान गोलंदाजाची तंदुरुस्ती आणि लय यांचा कस लागेल. ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यासारख्या भारताच्या ‘आयपीएल’ गाजविलेल्या युवा खेळाडूंचा या संघात समावेश आहे. परंतु भारतीय क्रिकेटच्या घटकांचे लक्ष हे बुमराहवर राहील. कारण एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेला असून त्या स्पर्धेसाठीच्या योजनांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा खेळाडू आहे. 29 वर्षीय बुमराह मागील वर्षी टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या पाठीच्या खालच्या बाजूला ताण पडल्याने झालेल्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्या शस्त्रक्रियेतून सावरून तो आता परत येत आहे.
पाच दिवसांच्या दौऱ्यातील तीन सामन्यांमध्ये तो जास्तीत जास्त 12 षटके टाकणार आहे. परंतु या मालिकेमुळे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्याची तंदुरुस्तीची स्थिती नेमकी कशी आहे त्याची योग्य कल्पना मिळू शकेल. 50 षटकांचे क्रिकेट हे वेगळे असते, जिथे बुमराहला दोन, तीन किंवा चार षटकांच्या स्पेलमध्ये 10 षटके टाकावी लागतील. ‘बीसीसीआय’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर बुमराहच्या गोलंदाजीचा एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये तो उजव्या हाताच्या गोलंदाजाला आखूड टप्प्याचा चेंडू आणि नंतर एका डावखुऱ्या गोलंदाजाला यॉर्कर टाकताना दिसतो. ही दृष्ये भारतीय संघ व्यवस्थापनासाठी निश्चितच दिलासादायक आहेत. पण प्रत्यक्ष सामन्यात परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल आणि द्रविड व रोहित या दोघांनीही गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी बुमराहला उतरविण्याच्या बाबतीत घाई करून हात भाजून घेतलेले आहेत. त्याचे परिणाम घातक ठरले. त्याने खेळलेली ती शेवटची मालिका होती. सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इतका काळ त्याला कधीच मैदानाबाहेर राहावे लागलेले नाही. बुमराहला या वर्षाच्या सुऊवातीला मायदेशातील मालिकेसाठी निवडण्यात आले होते. पण अंतिम क्षणी त्याला गाळावे लागले. कारण त्याच्या कारकिर्दीला धोकादायक ठरू शकणाऱ्या दुखापतीवरील उपचाराच्या अंतर्गत शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली होती. आयर्लंडमधील मालिकेमुळे बुमराहला चांगला सराव मिळेलच, शिवाय त्याला आशिया चषकासाठी तयार होण्यास मदत होईल. आशिया चषकात त्याला बाबर आझमसारख्या खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे.
हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर आणि डावखुरा फिरकीपटू जॉर्ज डॉकरेल यासारख्या उपयुक्त खेळाडूंचा समावेश असलेल्या अँड्य्रू बालबर्नीच्या नेतृत्वाखालील आयर्लंडने अद्याप भारताविऊद्ध एकही सामना जिंकलेला नसला, तरी टी-20 क्रिकेटचा विचार करता तो एक दर्जेदार संघ आहे हे लक्षात ठेवावे लागेल. त्यांचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटल हा गेल्या वर्षी ‘गुजरात टायटन्स’ संघाचा भाग होता आणि भारतीय संघाविऊद्ध आपली क्षमता दाखविण्यास तो उत्सुक असेल. या भारतीय संघातील बुमराह आणि संजू सॅमसन वगळता इतर खेळाडू हांगझाऊ येथे होणार असलेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळविण्यास आणि मुख्य खेळाडू या तीन टी-20 सामन्यांचा जास्तीत जास्त फायदा उठविण्यास उत्सुक असतील. संजू सॅमसनची जागा सध्या निश्चितच अस्थिर बनलेली आहे. मुख्य प्रशिक्षक सितांशू कोटक यांना संघ व्यवस्थापनाकडून आशिया चषकापूर्वी या केरळच्या खेळाडूला खेळवण्याची सूचना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला मुख्य संघात स्थान मिळविण्याची शक्यता कमीच दिसते. ‘आयपीएल’मधून पुढे आलेले जितेश आणि रिंकू यांना तेथे खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय शिवम दुबेही संधीसाठी उत्सुक असेल. बुमराहप्रमाणेच प्रसिद्ध कृष्णा देखील या मालिकेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याच्यावरही पाठीच्या दुखापतीमुळेही शस्त्रक्रिया करावी लागली होती. या आठवड्यात आशिया चषक संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी निवड समिती कृष्णाचा फॉर्म पाहतील.
संघ
भारत-जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड-अँड्य्रू बालबर्नी (कर्णधार), हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, रॉस अडायर, मार्क अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककर्थी, बेन व्हाइट, क्रेग यंग, थिओ व्हॅन वेरकॉम.
सामन्याची वेळ-संध्याकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स 18-1, स्पोर्ट्स 18-1 एचडी, स्पोर्ट्स 18 खेल टीव्ही. लाईव्ह स्ट्रीम : जिओ सिनेमा









