आशिया चषक अंतिम लढतीची पुनरावृत्ती, लंकेचा 55 धावांचा खुर्दा : गिल, कोहली, अय्यर यांची अर्धशतके : सामनावीर शमीचे 5 तर सिराजचे 3 बळी,
वृत्तसंस्था /मुंबई
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखत सर्वप्रथम उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. भारताने या स्पर्धेत सलग सात सामने जिंकून 14 गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. त्याचप्रमाणे येथील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा विक्रमी 302 धावांनी दणदणीत एकतर्फी पराभव केला. गुरुवारच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने 50 षटकात 8 बाद 357 धावा जमवित लंकेला 358 धावांचे कठीण आव्हान दिले. पण त्यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा केवळ 19.4 षटकात 55 धावात खुर्दा झाल्याने भारताने हा सामना विक्रमी 302 धावांनी जिंकला. बरोबर 45 दिवसांपूर्वी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत सिराजने भेदक मारा करीत लंकेचा केवळ 50 धावांत फडशा पाडला होता. या स्पर्धेतून बाहेर पडणारा लंका हा बांगलादेशनंतरचा दुसरा संघ आहे. 18 धावात 5 बळी मिळविणाऱ्या मोहम्मद शमीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने या स्पर्धेत दुसऱ्यांदा पाच बळी मिळविले असून तो वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज बनला आहे. त्याने आजवर एकूण 45 बळी घेतले आहेत.
2011 साली भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात लंकेचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. या घटनेची आठवण गुरुवारच्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली. या सामन्यामध्ये कोहलीचे शतक 12 धावांनी हुकले. त्यामुळे त्याला सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी आणखी कांहीवेळ वाट पहावी लागेल. शुभमन गिलचे शतक 8 धावांनी हुकले. तर श्रेयस अय्यरने 56 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावांची वादळी खेळी केली. गोलंदाजीत लंकेतर्फे मधुशंकाने 80 धावात 5 गडी बाद केले. त्यानंतर लंकेच्या डावामध्ये पहिल्या चेंडूपासूनच घसरण सुरू झाली. बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी भेदक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने 3 तर बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. वानखेडे स्टेडियमवर वनडे क्रिकेटमध्ये भारताने नोंदविलेली ही सर्वात मोठी धावसंख्या असून धावांच्या बाबतीत मिळविलेला हा सर्वात मोठा विजय आहे.
भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. मधुशंकाने कर्णधार रोहित शर्माचा पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळा उडविला. तत्पूर्वी शर्माने पहिल्या चेंडूवर चौकाराने आपले खाते उघडले होते. घरच्या मैदानावर शर्मा लवकर बाद झाल्याने शौकीन निराश झाले. दरम्यान विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 29.4 षटकात 189 धावांची भागिदारी केली. कोहली आणि गिल यांनी आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. पॉवरप्लेच्या 10 षटकात भारताने 60 धावा जमविताना एकमेव गडी गमविला होता. गिल आणि कोहली यांनी अर्धशतकी भागीदार 49 चेंडूत नोंदविली. भारताचे शतक 97 चेंडूत फलकावर लागले. तर गिलने आपले अर्धशतक 55 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या जोडीने शतकी भागीदारी 98 चेंडूत केली. भारताने दीड शतक 150 चेंडूत झळकविले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठीची दीड शतकी भागीदारी 150 चेंडूत करताना त्यामध्ये गिलचा वाटा 65 तर कोहलीचा 77 धावांचा होता. भारताचे द्विशतक 198 चेंडूत पूर्ण झाले.
30 व्या षटकात गिलने मधुशंकाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फटका मारण्याच्या नादात सोपा झेल दिला. यष्टीरक्षक मेंडीसने तो टिपला. गिलने 92 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 92 धावा झळकविल्या. गिल बाद झाल्यानंतर कोहली अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. मधुशंकाच्या चेंडूवर निशांकाने कोहलीला टिपले. त्याने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावा झळकविल्या. भारताची स्थिती यावेळी 31.3 षटकात 3 बाद 196 अशी होती. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव पुन्हा सावरताना चौथ्या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. भारताच्या 250 धावा 231 चेंडूत फलकावर लागल्या. 40 व्या षटकात चमीराने राहुलला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 2 चौकारासह 21 धावा केला. राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मधुशंकाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक मेंडीसकरवी झेलबाद झाला. त्याने 9 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा केल्या. मात्र एकाबाजूने श्रेयस अय्यर फटकेबाजी करत धावांची गती वाढवत होता. अय्यर आणि जडेजा यांनी 6 व्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. 48 व्या षटकात अय्यर मधुशंकाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 56 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह 82 धावा झोडपल्या. रविंद्र जडेजाने 24 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 35 धावा जमविल्या. तो शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. तत्पूर्वी मोहम्मद शमी शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 2 धावावर धावचीत झाला. भारताने शेवटच्या 10 षटकामध्ये 93 धावा जमविताना 4 गडी गमविले. भारताचे त्रिशतक 270 चेंडू तर 350 धावा 293 चेंडूत नोंदविल्या गेल्या. लंकेतर्फे मधुशंकाने 80 धावात 5 तर चमीराने 71 धावात 1 गडी बाद केला.
लंकेचा खुर्दा
मोहम्मद सिराज, बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा 19.4 षटकात 55 धावात खुर्दा झाला. पहिल्या चेंडूपासूनच लंकेच्या डावाला गळती लागली ती शेवटपर्यंत त्यांना रोखता आली नाही. लंकेच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. मॅथ्यूजने 25 चेंडूत 1 चौकारासह 12, रजिताने 17 चेंडूत 2 चौकारासह 14, तीक्ष्णाने 23 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 12 धावा केल्या. लंकेच्या 5 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. निशांका पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर करुणारत्ने दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. बुमराहने निशांकला पहिल्याच चेंडूवर पायचीत केले होते. त्यानंतर सिराजने आपल्या पहिल्याच षटकातील 5 व्या चेंडूवर समरविक्रमाला अय्यरकरवी झेलबाद केले. सिराजने कर्णधार मेंडीसचा एका धावेवर त्रिफळा उडविला. लंकेची स्थिती यावेळी 3.1 षटकात 4 बाद 3 अशी होती. असालेंका आणि मॅथ्यूज यांनी 5 व्या गड्यासाठी 11 धावांची भागीदारी केली असताना शमीने असालेंकाला जडेजाकरवी झेलबाद केले. शमीने आपल्या या षटकातील पुढील चेंडूवर हेमंताला यष्टीरक्षक राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. मॅथ्यूजने पुढील चेंडू खेळून काढत शमीची हॅट्ट्रीक थोपविली. शमीने आपल्या पुढील षटकातील तिसऱ्या चेंडूवर चमीराला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. नंतर शमीने मॅथ्यूजचा त्रिफळा उडविला. रजिता मोहम्मद शमीचा 5 वा बळी ठरला. जडेजाने मधुशंकाला अय्यरकरवी झेलबाद करून लंकेला 55 धावात रोखले. भारतातर्फे अवांतर 10 धावा मिळाल्या. लंकेच्या डावात 6 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 14 धावा जमविताना 6 गडी गमविले. लंकेच्या 50 धावा 111 चेंडूत नोंदविल्या गेल्या.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकात 8 बाद 357 (शर्मा 4, गिल 92, कोहली 88, अय्यर 82, राहुल 21, सूर्यकुमार यादव 12, रविंद्र जडेजा 35, शमी 2, बुमराह नाबाद 1, अवांतर 20, मधुशंका 5-80, चमीरा 1-71), लंका – 19.4 षटकात सर्वबाद 55 (असालेंका 12, तीक्ष्णा नाबाद 12, रजिता 14, मधुशंका 5, अवांतर 10, बुमराह 1-8, मोहम्मद सिराज 3-16, मोहम्मद शमी 5-18, जडेजा 1-4).
तेंडुलकरला मागे टाकत कोहलीचा नवा विक्रम
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला असून त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. विश्वचषकात गुरुवारी लंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने कॅलेंडर वर्षात एक हजार धावांचा टप्पा गाठला. हा पराक्रम करण्याची त्याची आठवी वेळ असून यापूर्वी सचिन तेंडुलकरने 7 वेळा हा विक्रम केला होता. कोहलीने यापूर्वी 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 मध्ये हजारहून धावा केल्या होत्या. तेंडुलकरने 1994, 1996, 1997, 1998, 2000, 2003, 2007 या वर्षी हा टप्पा पार केला होता. याशिवाय कोहलीने लंकेविरुद्ध सर्वाधिक 10 शतके नोंदवत एका संघाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके नोंदवण्याचा विक्रम केला आहे. मात्र वर्षात सर्वाधिक धावा जमविण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावे कायम असून त्याने 1998 मध्ये 1894 धावा जमविल्या होत्या. कोहलीने आणखी एक माईलस्टोन गाठताना वनडेतील 118 वे अर्धशतक नोंदवले. तेंडुलकरच्या नावे सर्वाधिक 145 वनडे अर्धशतके आहेत.
श्रेयस अय्यरचा या वर्ल्ड कपमधील सर्वात ‘मोठा’ षटकार
उसळते चेंडू खेळताना उडणारी तारांबळ पाहून श्रेयसबाबत चिंता व्यक्त केली जात होती. पण त्याने लंकेविरुद्धच्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करीत सर्वात मोठा षटकार मारण्याचा विक्रम केला. लंकन गोलंदाजांवर हल्ला करीत त्याने शानदार अर्धशतक नोंदवले. 36 व्या षटकात त्याने कसुन रजिथाला लाँगऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. त्याचा हा षटकार 106 मीटर्स अंतरावर जाऊन पडला. या वर्ल्ड कपमधील हा सर्वात मोठा षटकार असून त्याने मॅक्सवेलच्या 104 मीटर्सचा षटकार मागे टाकला. याआधी श्रेयसने अफगाणविरुद्ध 101 मी. षटकार मारला होता तर पाकच्या फखर झमानने बांगलादेविरुद्ध 99, डेव्हिड वॉर्नरने पाकविरुद्ध 98 मी.वर षटकार मारला होता.









