वृत्तसंस्था/यांगून (म्यॅनमार)
एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक 2026 च्या पात्र फेरी फुटबॉल स्पर्धेतील झालेल्या ड गटातील सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंडोनेशियाला गोल शुन्य बरोबरीत रोखले. हा सामना अनिर्णीत राहिल्याने भारतीय महिला फुटबॉल संघाने आपल्या गटातून एक गुण मिळविला आहे. या गटात यजमान म्यॅनमार पहिल्या स्थानावर आहे. याच ठिकाणी झालेल्या सामन्यात म्यॅनमारने तुर्कीचा 6-1 अशा गोलफरकाने पराभव केला. इंडोनेशिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉलपटूंनी पूर्वाधार्थ अधिक वेगवान खेळावर भर दिला होता. त्यामुळे इंडोनेशियाच्या बचाव फळीवर तसेच गोलरक्षकावरही चांगलेच दडपण आले होते.
या सत्रामध्ये भारताने गोल करण्याच्या किमान दोन संधी वाया दवडल्या. सिबानी देवी आणि बबीता कुमारी यांनी इंडोनेशियाच्या गोलपोस्टपर्यंत मजल मारली. पण इंडोनेशियाची गोलरक्षक अॅलिनाने भारताचे हे हल्ले यशस्वीपणे थोपविले. सामन्यातील 87 व्या मिनिटाला इंडोनेशियाला गोल करण्याची नामी संधी मिळाली होती. इंडोनेशियाच्या अॅझेंगने भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंना हुलकावणी देत गोलपोस्टपर्यंत मजल मारली. पण भारताची गोलरक्षिका मोनालिसा देवीने हा फटका अचूकपणे थोपविला. या सामन्यात दुखापतीच्या कालावधीत भारताने गोल करण्याच्या दोन संधी वाया घालविल्या. अंजू छानुच्या फ्री किकवरील फटका इंडोनेशियाच्या गोलरक्षकाने व्यवस्थीत अडविला. आता या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा दुसरा सामना तुर्कीबरोबर शुक्रवारी होत आहे.









