भारतीय राजदूताला केले पाचारण : सीमेवर तणावाचे वातावरण
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून हटविण्यात आल्यापासून तेथील अंतरिम सरकार भारतासोबत तणाव निर्माण करत आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांवरून भारताने अनेकदा चिंता व्यक्तत केली आहे. तर आता सीमेवर बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) आणि बीएसएफ दरम्यान तणाव वाढला आहे. भारताने संभाव्य धोका ओळखून सीमेवर काटेरी कुंपण उभारण्याचे काम हाती घेतले आहे. याचदरम्यान बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने सीमेवरील तणावावरून भारतीय राजदूत प्रणव वर्मा यांना पाचारण केले.
भारत द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत भारत-बांगलादेश सीमेवर 5 ठिकाणी कुंपण उभारण्याचे काम करत असल्याचा आरोप बांगलादेशने केला होता. यानंतर बांगलादेश सरकारने वर्मा यांना पाचारण करत त्यांच्यासमोर भूमिका मांडली आहे. बांगलादेशचे विदेश सचिव जशीम उद्दीन यांच्यासोबत वर्मा यांची बैठक सुमारे 45 मिनिटांपर्यंत चालली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून या चर्चेसंबंधी कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, परंतु अधिकाऱ्यांनी भारतीय राजदूताला पाचारण करण्यात आले होते याची पुष्टी दिली आहे.
बांगलादेशच्या सैन्याने गोडालिया नदीच्या काठावर 5 किलोमीटरच्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा बीजीबीच्या एका कमांडरने काही दिवसांपूर्वी केला होता. या वक्तव्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर बीजीबी आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांची फ्लॅग मीटिंग झाली होती. बीजीबीच्या अधिकाऱ्याने भ्रम पसरविणारे वक्तव्य केल्याचे बीएसएफने स्पष्ट केले होते.
सीमेवर बांगलादेशच्या हालचाली संशयास्पद असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. तर बीएसएफकडून बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्वीच हाती घेण्यात आले होते. बांगलादेशच्या हद्दीत सीमेनजीक खोदकाम होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे बांगलादेश बंकर निर्माण करण्याची तयारी करत असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये शाब्दिक झटापटही झाली आहे. अशास्थितीत बीजीबीने सीमेवरील स्वत:च्या जवानांची संख्या वाढविली आहे. तर बीएसएफने देखील सीमेवर जवानांची तैनात वाढविली आहे.
बीएसएफ-बीजीबीदरम्यान चर्चा : वर्मा
ढाका आणि नवी दिल्लीदरम्यान सुरक्षेसाठी सीमेवर कुंपण उभारण्यासंबंधी सहमती आहे. दोन्ही देशांचे सीमा रक्षक दल बीएसएफ आणि बीजबा यासंबंधी संवाद साधत आहेत. हा निर्णय सहमतीने लागू केली जाईल आणि सीमेवर गुन्ह्यांना हाताळण्यासाठी एक सहकार्यात्मक दृष्टीकोन अवलंबिला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे उद्गार वर्मा यांनी बैठकीनंतर काढले आहेत.









