वृत्तसंस्था /चेन्नई
विश्व स्क्वॉश संघटनेतर्फे येथे सुरू असलेल्या 2023 च्या विश्वचषक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ब गटातील झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत शेवटच्या चार संघातील आपले स्थान निश्चित केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ब गटातील खेळवण्यात आलेल्या या लढतीतील पहिल्या सामन्यात भारताच्या तन्वी खन्नाने दक्षिण आफ्रिकेच्या हेली वॉर्डचा 7-4, 7-2, 3-7, 7-2 असा पराभव केला. हा सामना एकतर्फीच झाला पण या लढतीत भारताच्या तन्वीला एक गेम गमवावा लागला. दुसऱ्या सामन्यात भारताच्या सौरभ घोषालने दक्षिण आफ्रिकेच्या डिवेल्ड व्हॅन निकर्कचा 7-6, 7-4, 7-1 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत आपल्या संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. या लढतीतील तिसऱ्या सामन्यात भारताच्या जोश्ना चिन्नप्पाने दक्षिण आफ्रिकेच्या लिझेली मुलेरवर 7-4, 7-3, 3-7, 7-1 अशा गेम्समध्ये मात केली. शेवटच्या सामन्यामध्ये भारताच्या अभय सिंगने दक्षिण आफ्रिकेच्या जिन पेरी ब्रिट्सचा 7-4, 3-7, 7-6, 7-5 असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेला या लढतीमध्ये एकही सामना जिंकता आला नाही. या विजयामुळे भारताने ब गटात 12 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले असून या गटात जपान 10 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे.









