वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला यांच्या कबड्डी या प्रकारात भारताच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या विभागातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा तर महिलांच्या विभागात भारताने नेपाळचा पराभव करत सुवर्णपदकासाठीच्या फेरीत प्रवेश मिळवला.
पुरुषांच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61-14 असा दणदणीत फडशा पाडला. 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या सामन्यात भारताने मध्यंतरापर्यंत पाकवर 30-5 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. या कालावधीत भारताने 28 गुण तसेच दोन बोनस गुणांची वसुली केली. आता इराण आणि चीन तैपेई यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळवला जात असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर भारताचा शनिवारी सुवर्णपदकासाठी सामना होईल.
महिलांच्या विभागात शुक्रवारच्या उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 61-17 असा पराभव केला. भारतीय महिला कब•ाr संघाने सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने मध्यंतरापर्यंत 29-10 अशी आघाडी मिळवली होती. भारतीय संघातील पूजा हटवाला आणि पुष्पा राणा यांनी दर्जेदार खेळ केला. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाचवेळा नेपाळचे सर्व गडी बाद केले. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारी झारखंडची अकिश्मा हिने या स्पर्धेद्वारे आपले आंतरराष्ट्रीय कबड्डी क्षेत्रात पदार्पण केले.









