वृत्तसंस्था/ बेनोनी
आयसीसीतर्फे 19 वर्षांखालील महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 14 ते 29 जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे भरविली जाणार आहे. सदर स्पर्धा पहिल्यांदाच आयसीसीने आयोजित केली आहे. या स्पर्धेत भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांचा ड या एकाच गटात समावेश आहे.
या स्पर्धेसाठी ड गटामध्ये यजमान दक्षिण आफ्रिका, भारत, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिरात यांचा सहभाग राहील. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले अकरा देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, इंडोनेशिया आणि रेवांडा हे संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेत आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 41 सामने खेळविले जाणार असून बेनोनीमधील चार स्टेडियम्सवर हे सामने खेळविले जातील. बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा अ गटात समावेश असून या गटात बांगलादेश, लंका आणि अमेरिका, ब गटात इंग्लंड, पाक, रवांडा आणि झिम्बाब्वे, क गटात न्यूझीलंड, आयर्लंड, इंडोनेशिया व विंडीज यांचा समावेश आहे. या स्पर्धेनंतर आयसीसी महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.









